घरमुंबईआधी अजितदादा तर आता पार्थ पवारांमुळे ठाकरे सरकार अस्थिरतेच्या भोवऱ्यात

आधी अजितदादा तर आता पार्थ पवारांमुळे ठाकरे सरकार अस्थिरतेच्या भोवऱ्यात

Subscribe

राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजितदादा पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या बरोबर पहाटे शपथ विधी उरकून राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर अजितदादांची समजूत घालण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले आणि फडणवीस आणि अजित दादांचे सरकार अवघ्या ४८ तासात कोसळले. आज पुन्हा एकदा या घटनेची आठवण प्रकर्षाने झाली आणि त्याला कारणीभूत ठरले अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार.

सिने अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूडशी संबंध असलेले त्यांचे चिरंजीव व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे याप्रकारे अडचणीत सापडले असताना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीसह राज्यातील ठाकरे सरकारला पुन्हा एकदा जोरदार दणका दिला. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी याप्रकरणी पार्थ त्याला जाहीरपणे कानपिचक्या दिल्या असल्या तरी राज्यातील महाआघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये अजित दादांचे मन रमतं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध ही पक्षाची अधिकृत भूमिका असताना राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे सुपुत्र जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी करतात तेव्हा पवार कुटुंबातील कलहाची किनारही पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अस्थिरतेच्या भोवऱ्यात लोटते की काय अशीही चर्चा होऊ लागली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात राष्ट्रवादीतील ही घडामोड राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू राहिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतः सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचे प्रकरण मुंबई पोलीस सक्षमपणे हाताळत असल्याचे वारंवार स्पष्ट करत त्याच्या सीबीआय चौकशीला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. मात्र असे असतानाही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून सुशांत सिंह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांच्या मागणीमुळे विरोधी पक्ष भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाजप प्रेम हे काही लपून राहिलेले नाही. राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे, त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्याची आर्थिक घडी ठप्प आहे. त्यात राज्यातील ठाकरे सरकारला केंद्र सरकारकडून म्हणावे तसे पाठबळ मिळत नाही. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत ही अजितदादा फारसे समाधानी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचा गाडा पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा ते केंद्र सरकारच्या पाठबळाशिवाय ते शक्य नाही अशी ठाम भावना अजित पवार समर्थकांची झाली आहे. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार हे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण करत असल्याने अजित पवार यांचा राजकीय कोंडमारा झाला असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे.

- Advertisement -

पार्थ पवार यांची आजची सीबीआय चौकशीची मागणी अजित पवारांच्या भाजपा प्रेमाच्या मानसिकतेमधूनच पुढे आली असल्याचे बोलले जात आहे. भाजपातील केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबातील कलह वादाला जोरदार फोडणी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर हल्ला चढवताना त्यांचे पुतणे अजित पवार हे कसे राष्ट्रवादी विरोधी कारवाया करत असतात. यावर सातत्याने भाष्य केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात येत असतानाच अचानक पहाटे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घाईघाईने शपथविधी उरकून घेतला होता. त्याच वेळी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार समर्थकांमध्ये उघड संघर्ष पेटला होता. मात्र या कौटुंबिक वादाला शांत करण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या वेळेस यश आले होते.

शरद पवारांवर दबावतंत्राचा वापर?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणावयाचे आहे. मात्र असे करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शिवसेनेची साथ नको आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार भाजप बरोबर येत नाहीत अथवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडून भाजपबरोबर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात भाजप सरकार येणे शक्य नाही याची पूर्ण जाणीव केंद्रातील भाजप नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे अजित पवार यांना गळाला लावण्याचे पुरेपूर डावपेच सुरू आहेत. राष्ट्रवादीला खिळखिळे करून, फोडाफोडी करून केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रात भाजप सरकार आणावयाचे असल्याची कुणकुण शरद पवार यांना लागली असल्यानेच त्यांनी आज पार्थ पवार यांना जाहीरपणे कानपिचक्या दिल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीत शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो, असा स्पष्ट संदेश यातून आजच्या केंद्रीय नेतृत्वाला पवार यांनी दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे केंद्रीय नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना हाताशी धरून शरद पवार यांच्यावरील दबावतंत्र वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात होत आहे. पवार कुटुंबातील या कलहामुळे मात्र राज्यातील ठाकरे सरकार पुन्हा एकदा अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडले आहे.

हेही वाचा –

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादा नाराज? ‘सिल्व्हर ओक’वर तातडीची बैठक!

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -