घरमुंबईमोनोची पुन्हा बोंबाबोंब, दुसऱ्याच दिवशी बंद पडली!

मोनोची पुन्हा बोंबाबोंब, दुसऱ्याच दिवशी बंद पडली!

Subscribe

बहुप्रतिक्षित मोनो रेल १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पण, दुसऱ्याच दिवशी मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाचा फटका हा सर्वात जास्त प्रवाशांना बसला.

तब्बल १० महिन्यांनंतर मोठ्या आशेनं सुरू झालेली मोनो रेल दुसऱ्याच दिवशी बंद पडल्यामुळे मोनो प्रकल्पाचं मुंबईकरांमध्ये हसं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ऐन गर्दीच्या वेळी हा सगळा प्रकार घडल्यामुळे मुंबईकरांना मनस्तापही सहन करावा लागला. १ सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी सकाळी ६ वाजता मोनोरेल १० महिन्यांनंतर मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली होती. चेंबूर ते वडाळा अशी पहिली मोनो शनिवारी धावली आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण त्यांचा हा दिलासा अल्पकाळच टिकला. रविवारी दुपारी चेंबुर नाक्याजवळ मोनोरेल बंद पडल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड तर झालाच, पण मनस्ताप झाला तो वेगळाच!

चेंबुर नाक्याजवळ केबल अडकली

चेंबुर नाका स्टेशनजवळ टीव्ही केबल अडकल्यामुळे दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी मोनोरेल अडकली. ही बिघडलेली मोनरेल पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले गेले. अखेर संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोनोरेल पुन्हा पूर्ववत सुरु झाली. मोनोरेल बंद पडल्याची बातमी समजताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. काही प्रवासी या अडकलेल्या मोनोरेलमध्ये होते असंही सांगण्यात आलं आहे. एकाच जागी थांबलेल्या मोनोरेलचा बिघाड अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दुरुस्त करण्यात आला.

- Advertisement -

तुम्हाला हे माहिती आहे का? – कसा झाला मोनोरेलचा आतापर्यंतचा प्रवास?


काय आहे मोनोचं नवीन वेळापत्रक?

नव्या वेळापत्रकानुसार, चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोनो पुन्हा धावणार आहे. मोनो रेल्वेचा हा टप्पा सुरू करताना प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा ‘एमएमआरडीए’ प्रशासनाचा विचार होता. मात्र, सध्या प्रवासी भाड्यात कुठलीही वाढ केलेली नाही. दर १५ मिनिटांच्या अंतराने स्थानकांमध्ये मोनो दाखल होते. तर, दिवसभरात मोनोच्या १३० फेऱ्या होतात. वडाळा स्थानकामधून रात्री ९.५३ आणि चेंबूर स्थानकामधून रात्री १०.०८ मिनिटांनी शेवटची मोनोरेल सुटेल, असे मोनोचे सध्याचे वेळापत्रक आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मोनो ट्रॅकवर, पण तोट्यातच!!


नऊ महिन्यांनी सुरू झाली मोनो

नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली. या आगीत मोनोचे २५ कोटींचे नुकसान झाले. तेव्हापासून मोनो बंद होती. नऊ महिन्यांपासून बंद असलेली देशातील पहिली मोनो रेल्वे शनिवारपासून पुन्हा सुरू झाली. फेब्रुवारी २०१४ ला देशातील ही पहिली मोनो रेल्वे मुंबईतील चेंबूर ते वडाळा मार्गावर धावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -