घरताज्या घडामोडीमुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच केले 'शतक' पार

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच केले ‘शतक’ पार

Subscribe

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे सुरू असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी, मुंबई पोलिसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंध विषयक बाबी अशा महापालिकेद्वारे प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि महापालिकेद्वारे घेण्यात येत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांना नागरिकांची मोलाची साथ मिळत असल्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने अर्धशतक पार केले होते. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठत आज ‘शतक’ पार केले आहे. यानिमित्ताने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या अव्याहत प्रयत्नांना मोलाची साथ देणाऱ्या मुंबईकरांचे आभार मानत लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात ‘मिशन झिरो’ हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रभावीपणे अथक प्रयत्न करायचे आहेत, असेही महापालिका आयुक्तांनी आवर्जून नमूद केले आहेत.

महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. तथापि, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने केलेली अधिक प्रभावी सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन रुग्ण दुपटीचा कालावधी १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस आणि आजच्या २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. यात विशेष नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून तो १०२ दिवस इतका झाला आहे.

- Advertisement -

वरीलबाबत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास २४ पैकी ३ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक आहे, तर या व्यतिरिक्त ११ विभागांमध्ये सदर कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक असणाऱ्या ३ विभागांमध्ये ‘जी दक्षिण विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक असून तो १७५ दिवस इतका आहे. तर या खालोखाल ‘इ’ विभागात १६० दिवस, आणि एफ दक्षिण विभागात १५७ दिवस इतका आहे.

तसेच वरील ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये ‘बी’ विभागात १३७ दिवस, ‘जी उत्तर’ विभागात १३६ दिवस आणि ‘एम पूर्व’ व ‘ए’ विभागात १३५ दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.

- Advertisement -

रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजे नक्की काय?

‘कोरोना कोविड – १९’ या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. सध्या महापालिका क्षेत्राचा रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता सरासरी १०२ दिवस इतका झाला आहे. याचाच अर्थ सांख्यिकीय गणनेनुसार महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या १०२ दिवसांचा कालावधी लागतोय. हा आकडा जेवढा अधिक किंवा मोठा असेल, तेवढी ती बाब आपल्यासाठी सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.


हेही वाचा – Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -