घरमुंबईनायर दंत महाविद्यालयाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर

नायर दंत महाविद्यालयाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर

Subscribe

शैक्षणिक सोई-सुविधांमुळे देशातील तीन विविध सर्वेक्षणामध्ये नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाची दखल घेण्यात आली आहे. नायर दंत महाविद्यालय देशात पाचवे तर सार्वजनिक क्षेत्रात तिसरे उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्णालय ठरले आहे

कोरोना रुग्णांसाठी रुग्णालय उपलब्ध करून देणारे पालिकेचे नायर दंत वैद्यकीय महाविद्यालय देशातील एकमेव महाविद्यालय ठरले. त्यानंतर शैक्षणिक सोई-सुविधांमुळे देशातील तीन विविध सर्वेक्षणामध्ये नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाची दखल घेण्यात आली आहे. नायर दंत महाविद्यालय देशात पाचवे तर सार्वजनिक क्षेत्रात तिसरे उत्कृष्ट कामगिरी करणारे रुग्णालय ठरले आहे.

‘द वीक’ या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दंत महाविद्यालयांमध्ये नायरने पाचवे स्थान पटकावले आहे. ‘आऊटलुक’ साप्ताहिकाच्या सर्वेक्षणामध्ये देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये तिसरे स्थान मिळवले आहेत. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणात नायरला सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील तीन वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याचे नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले.

- Advertisement -

नायर दंत महाविद्यालयात एकावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेतात. यामध्ये पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि तीन वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी ५७ प्राध्यापक महाविद्यालयात कार्यरत आहेत. २४ तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय आहे. दरवर्षी साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत असून, नऊ ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग आहेत. स्वतंत्र शस्त्रक्रियागृह असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे. सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, दंत वैद्यकीय शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -