फ्लिपकार्टची सेवा आता भारतीय भाषांमध्येही

महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी परप्रांतीयांना दणका देणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टला दणका दिला होता. अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. त्यामुळे मनसेने गुरुवारी या दोन्ही कंपन्यांच्या मुंबईतील मुख्यालयांना भेट देत सात दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश न केल्यास तुम्हाला दिवाळी धमाका नाही तर मनसे धमाका दाखवू असा इशारा दिला होता. पण या मुद्द्यावर फ्लिपकार्टने आपले म्हणणे मांडले आहे.

काय म्हणण आहे फ्लिपकार्टच

ग्राहकांना नवनवीन दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी इकॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली फ्लिपकार्ट भारतात ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी; तसेच या उद्योगाचे लोकशाहीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
येत्या काही महिन्यांत, ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट काही अत्यंत नाविन्यपूर्ण गोष्टी सादर करणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल. भारतात सर्वदूर पोहोचण्यासाठी आपल्या देशातील विविध भाषा आणि व्हॉइस सोल्यूशन्सचा वापर करण्याचा फ्लिपकार्टचा निर्धार आहे.
मातृभाषेतून ई-कॉमर्सच्या वापरामुळे या उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित तर होतीलच; पण आपल्या देशातील लाखो लघु उद्योजक व मध्यम उद्योजक तसेच कारागिरांनाही एक प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

– फ्लिपकार्ट प्रवक्ता