घरमुंबईपूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मिळणार तीन महिन्यांचा पगार

पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मिळणार तीन महिन्यांचा पगार

Subscribe

मागील ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर,सांगली आणि सातारामध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला होता. त्याचा मोठा फटका त्या भागातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना बसला होता. एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी कामावर जाऊ शकले नाहीत. त्या कर्मचार्‍यांना पाठबळ न देता, त्यांची रजा लावण्यात आली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले होेते. त्यानंतर झोपी गेलेल्या एसटी महामंडळ प्रशासनाला जाग आली आहे. आता पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना 3 महिन्यांचे अग्रीम वेतन देण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.

कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी पूर आला होता. या कालावधीत एसटीची अनेक विभागीय आगार बंद होती. पुरामुळे एसटी मार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांना कामावर रूजू होता आले नाही. कोल्हापूर आणि सांगलीतील अनेक एसटी कर्मचार्‍याचे संसार उद्ध्वस्त झाले होते.

- Advertisement -

अशा कर्मचार्‍यांना एसटी महामंडळाने मदत तर केली नाहीच उलट त्यांना सुट्ट्यांचे अर्ज भरण्यास सांगितले होते. यासंबधी वृत्त सर्वप्रथम दैनिक आपलं महानगरने प्रकाशित केले. तो मुद्दा एसटी कर्मचार्‍यांनीही उचलून धरला. परिणामी एसटी महामंडळाकडून पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांसाठी नुकतेच एक पत्रक काढण्यात आले. त्याद्वारे, पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या एसटी कामगारांना तीन महिन्यांचे अग्रीम वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने एसटी कर्मचार्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. अशा कर्मचार्‍यांनी विभाग प्रमुखाकडे आगाऊ पगारासाठी अर्ज करावा. पूरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील देण्यात यावा.महसूल यंत्रणेकडून एसटी कामगारांना पूरग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना आगाऊ पगार दिला जाईल. हा आगाऊ पगार सलग 36 महिने हप्यातून वसूल केला जाईल, असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.

- Advertisement -

इतर भत्ते सुध्दा ?
नैसर्गिक आपत्तींत एसटी कर्मचार्‍यांना 30 दिवसापर्यंत विशेष रजा (भरपगारी रजा) देण्याच्या अधिकार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना महामंडळाने दिला आहे. त्यामुळे पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना या अधिकाराचा वापर करत भर पगारी रजा मंजूर करावी. सोबतच नियमानुसार आपत्ती पिडीत एसटी कर्मचार्‍यांना मूळ वेतन अधिक महागाई भत्ता मिळून तीन महिन्यांचे अग्रीम वेतन देण्याची तरतूद आहे. मात्र आतापर्यत एसटीने अग्रीम वेतन देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एसटी महामंडळाने विशेष रजा (भरपगारी रजा) देण्यात यावी अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -