खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले

राज्यात एका वर्षात ९३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Mumbai
food mixture incidents raised in India
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ

एकीकडे मुंबईसह राज्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे या भेसळ विक्रेत्यांवर वारंवार कारवाईचा बडगा उगारला जातो. राज्यात गेल्या एका वर्षात ९३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी खाद्य पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यातून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यानुसार, गेल्या ३ वर्षांत देशभरात तब्बल २ लाखांहून अधिक भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या अशा ८ हजार १२४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – विना प्रिस्क्रिप्शन औषध विक्री भोवणार

खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणं, अस्वच्छ ठिकाणी अन्नपदार्थ बनवणं, तसंच ऑनलाईन फूड विक्री करणाऱ्या कंपन्याही परवाना नसलेल्या हॉटेलचं अन्न पुरवत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि राज्यातील अन्न आणि औषध विभाग (एफडीए) अनेक वर्षे काम करत आहे.

ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्याअंतर्गत अनेक नियम बनवले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह या नियमांची अंमलबजावणी केली जाते. अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना नियमित तपासणी आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई केली जात आहे आणि त्याची आकडेवारी राज्यांनी दिलेली असल्याचंही दानवे यांनी सांगितलं.

वर्ष                        भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे नमुने

२०१६-१७                        १८,३२५

२०१६-१८                        २४,२६२

२०१८-१९ (९ जुलैपर्यंत)        २०,०३१

२०१७-१८ या वर्षात

राज्य         भेसळयुक्त      नमुने शिक्षा

यूपी             ८३७५          ३२३७

पंजाब           ३०५४             २२

तामिळनाडू     २४६१            ८९६

महाराष्ट्र         १५३२              ९३

एफएसएसएआयकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न विषबाधेची अनेक प्रकरणं आढळली आहेत. देशातील काही राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ सालापासून ते ९ जुलै, २०१९ पर्यंत ८ हजार १२४ भेसळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न आणि सार्वजनिक वितरण