टिळक पुलाच्या पर्यायी बांधकामासाठी दोन जागा निश्चित

अंतिम जागेची निवड करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची निवड

Mumbai
Tilak Bridge

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेवर पूर्व-पश्चिम जोडणारा टिळक पूल धोकादायक बनल्याने भविष्यात तो बंद केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्भवली जाऊ शकते. त्यामुळे पुलाच्या पर्यायी बांधकामाची मागणी होत आहे. त्यानुसार महापालिकेने या पुलाच्या पर्यायी बांधकामासाठी दोन जागा निश्चित केल्या आहेत. यासाठी तांत्रिक सल्लागाराची निवड केली असून, दोनपैकी कोणत्या जागेवर पूल बांधता येईल याचा अहवाल आल्यानंतर या पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार केला जाणार आहे.

दादरमधील टिळक पूल हा ब्रिटिशकालीन असून, तो १०० वर्षे जुना आहे. त्यामुळे ब्रिटिशांनीही मुंबई महापालिकेला पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपल्याचे कळवले आहे. तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी नेमलेल्या संस्थांनीही हा पूल धोकादायक असल्याचे म्हटले होते. हा पूल म्हणजे दादर पूर्व व पश्चिमेला जोडणारे आहे. त्यामुळे धोकादायक म्हणून पूल भविष्यात पाडल्यास पूर्व व पश्चिमेला जोडला जाणारा मार्ग बंद होऊन स्थानिक नागरिकांची वाहतुकीची मोठी गैरसोय होईल, अशी भीती सातत्याने माटुंगा पश्चिमच्या शिवसेना नगरसेविका व महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच सभांमध्ये व्यक्त केली होती. या पुलाकरिता पर्यायी पूल बांधण्याबाबत वारंवार चर्चा करूनदेखील प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी या पुलाची पाहणीदेखील करण्यात आली होती, असे सांगत राऊत यांनी या विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वी मनसेने या पुलावर बॅनर लावून सध्या मुंबईतील टिळक पुलाची परिस्थिती पाहता आपण स्वत:च्या जबाबदारीवर या पुलाचा वापर करावा, असे आवाहन केले.

मात्र या धोकादायक पुलाचा विचार करता महापालिकेच्या पूल विभागाने पर्यायी मार्गाचा शोध घेतला आहे. टिळक पुलाचे रिगर्डरींग करायचे आहे. याबाबत पश्चिम रेल्वेमार्फत प्रस्ताव प्राप्त होताच महापालिका व रेल्वे प्रशासनामधील प्रचलित धोरणानुसार पुनर्बांधणीचे काम पूल विभागाच्यावतीने करण्यात येईल, असे पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे. दरम्यानच्या काळात टिळक पुलाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडील बाजूला पूर्व-पश्चिम दिशेला जाण्यासाठी अतिरिक्त पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. माटुंगा पश्चिम येथील बाळ गोविंददास रोड ते माटुंगा पूर्व येथील दडकर मैदान यांना जोडणारा पूल, तर दादर फूल मार्केटच्या पादचारी पुलाच्या जागी नवीन पुलाची बांधणी करणे अशा दोन जागा निश्चित केल्या आहेत. या दोन्ही जागेच्या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी पॅनेलवरील तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टिळक पुलांच्या पर्यायी बांधकामांसाठीच्या जागा
* माटुंगा पश्चिम येथील बाळ गोविंददास रोड ते माटुंगा पूर्व येथील दडकर मैदान
* दादर फूल मार्केटच्या पादचारी पुलाच्या जागी नवीन पुलाची बांधणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here