घरमुंबईआयुक्तांचे मन आता महापालिकेत रमेना?

आयुक्तांचे मन आता महापालिकेत रमेना?

Subscribe

प्रथमच मासिक आढावा सभा केली रद्द

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजोय मेहता यांनी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी मासिक आढावा बैठक घेण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे दर महिन्याला मासिक आढावा बैठक घेण्यात येते. सलग तीन वर्षांपासून कोणताही खंड न पाडता अविरतपणे या मासिक सभा घेणार्‍या आयुक्तांनी प्रथमच मार्च महिन्यात सभा घेतली नाही. त्यामुळे आयुक्तांचे आता महापालिकेत मन रमत नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. आयुक्त जाणार अशी चर्चा सुरू असताना मात्र आयुक्तांना सप्टेंबरपर्यंत महापालिकेत रहावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे अजोय मेहता यांनी एप्रिल २०१५मध्ये स्वीकारली. त्यानंतर दुसर्‍याच महिन्यापासून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख आदींची मासिक आढावा बैठक घेण्यात येईल, असे जाहीर केले. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील शनिवारी ही मासिक आढावा बैठक घेतानाच त्यांनी सर्वोकृष्ट कामगिरी बजावणार्‍या अधिकार्‍याचा गौरव करण्यासाठी ‘महिन्याचा मानकरी’ या पुरस्काराची घोषणा केली. तेव्हापासून प्रत्येक मासिक सभेत एका अधिकार्‍याचा किंवा त्यांच्या टिमला महिन्याचा ‘मानकरी पुरस्कार’ देवून गौरविण्यात येते.

- Advertisement -

महापालिका आयुक्तांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २ मे २०१५ रोजी पहिली मासिक सभा घेतली. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९पर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता या मासिक आढावा बैठका घेतल्या आहेत. आतापर्यंत तब्ब्ल ४६ मासिक आढावा बैठका घेतल्या. परंतु प्रथमच मार्च २०१९ची मासिक आढावा बैठक झालेली नाही. २ मार्च २०१९ला ही बैठक होणे अपेक्षित होती. त्याच दिवशी महापालिकेचा सन २०१९-20चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात आयुक्तांना ही सभा घेता आली असती. पण आयुक्तांनी ही बैठक आधीच रद्द केली होती. त्यानंतरच्या आठवड्यात ही बैठक घेता आली असती. तीसुध्दा घेतली गेली नाही. त्यामुळे आजवरची प्रथाच खंडित झाली आहे.

या मासिक सभांच्या माध्यमातून विकासकामांमधील खातेप्रमुख आणि विभागीय कार्यालयांमधील अधिकार्‍यांना येत असलेल्या अडचणींवर मात केली होती. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून देताना प्रत्येक खात्याचा आणि विभागांचा आढावा घेत आयुक्तांनी त्या त्या परिस्थितीप्रमाणे संबंधितांना आदेश देत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आढावा बैठक हे आयुक्तांसाठी महत्वाचा दुवा होता आणि तो फॉर्म्युला यशस्वी ठरला होता. परंतु मार्च महिन्यात आयुक्तांच्या बदलीची हवा चालली. या चर्चेमुळे आयुक्त आता महापालिकेतून जाणार असे असतानाच त्यांची बदली होण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत ते महापालिकेतच राहणार आहेत. निवृत्तीपर्यंत इथेच राहायचे असल्याने सध्या तरी आयुक्तांचे मन महापालिकेत रमताना दिसत नाही. त्याच उद्विग्नतेने त्यांनी मासिक सभा रद्द केल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

तांत्रिक कारणांमुळे पडला खंड
या महिन्यात मासिक आढावा बैठक ही केवळ त्यादिवशी अर्थसंकल्प मंजूर करायचे असल्याने घेतली नव्हती. परंतु त्यानंतर पुढील आठवड्यात मासिक बैठक घेण्याचा विचार होता. पण तोवर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळेच ही बैठक होवू शकली नाही. मात्र, काही कारणांमुळे या महिन्यात आढावा बैठकीला खंड पडला असला तरी यापुढे पडणार नाही. महापालिकेचे कामकाज पहिल्या दिवसापासून ज्याप्रमाणे सांभाळत आहे, त्याचप्रमाणे आजही सांभाळत आहे. या मासिक सभांमुळेच विभागातील विकासकामे कोणत्याही अडचणींविना पार पडत आहेत. सर्व खात्यांवर आणि त्यांच्या कामकाजांवर माझे लक्ष आहेच. शिवाय नियंत्रणही आहे.
– अजोय मेहता, महापालिका आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -