मतदान दिवशी दुकाने, कंपन्या बंद ठेवण्याची सक्ती

आदेश न पाळणार्‍यांवर होणार कारवाई

Mumbai
BMC
मुंबई महानगर पालिका मुख्यालय

मुंबईत येत्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी लोकसभेच्या सहा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी शहर व उपनगरातील प्रत्येक दुकान आणि कंपनी बंद ठेवण्याची अर्थात कर्मचार्‍यांना सुट्टी देण्याची सक्ती करणारा आदेश महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे या दिवशी महापालिकेचा दुकान व आस्थापने विभाग ‘वॉच’ ठेवणार असून ज्या ठिकाणी दुकान किंवा कंपनी सुरू असेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकाने घेतला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी दुकान व्यापार्‍यांना आणि कंपन्यांच्या मालकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मुंबईत चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदानाचे कर्तव्य बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. जनतेने मतदान करावे म्हणून निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी कर्मचार्‍यांना सुट्टी देणे आवश्यक आहे. यासाठी दुकाने तसेच आस्थापना अर्थात कंपन्या बंद ठेवणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी जर कुठे दुकाने किंवा कंपन्या सुरू ठेवून कर्मचार्‍यांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार आल्यास महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागातील पथकाद्वारे तातडीने संबंधित दुकानदार आणि व्यापार्‍यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

त्यामुळे अशा प्रकारे मतदानाच्या दिवशी दुकाने तसेच कंपन्या बंद ठेवल्या जातात किंवा नाही यावर महाालिकेच्या दुकान व आस्थापने विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने दुकाने व आस्थापना विभागाच्या २५ अधिकार्‍यांना तैनात करून त्यांची पथके तैनात रवाना करण्यात येणार आहेत.