घरमुंबईधक्कादायक! विदेशी तरुणीसह महिलेचा विनयभंग

धक्कादायक! विदेशी तरुणीसह महिलेचा विनयभंग

Subscribe

विदेशी तरुणी आणि महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

अंधेरी आणि बोरिवली येथे एका विदेशी तरुणीसह एका अन्य महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा आणि बोरिवली पोलिसांनी दोन विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद करुन एका आरोपीस अटक केली तर दुसर्‍या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरात ही विदेशी तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत भाडेकरु म्हणून राहते. शुक्रवारी तिची प्रकृती ठिक नव्हती, त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरकडून ती तिच्या निवासी इमारतीजवळ आली होती. यावेळी इमारतीची एक लिफ्ट बंद होती, त्यामुळे तिने दुसर्‍या लिफ्टने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे लालबिहारी राघव सिंग याने तिला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तक्रारदार तरुणी प्रचंड घाबरली आणि तिने तिच्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिसांत लालबिहारीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दुसरी घटना बोरिवली परिसरात घडली. ३५ वर्षांची ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यांत एका अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ येत होते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र अज्ञात व्यक्तीकडून सतत त्यांना अश्लील मॅसेज पाठविले जात होते. त्यामुळे या महिलेने शुक्रवारी बोरिवली पोलिसांत या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -