घरमुंबईअयोध्येला पोलीस छावणीचे स्वरूप

अयोध्येला पोलीस छावणीचे स्वरूप

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे देशभर वारे वाहू लागले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्या दौर्‍याची घोषणा केली. त्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक रवाना झाले आहेत. त्याचवेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनीही ‘हुंकार’ रॅलीचे आयोजन केले आहे. अशा प्रकारे राममंदिराच्या विषयावर मोठमोठ्या संघटना अयोध्येच्या रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यातून ६ डिसेंबर १९९२ सारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन अयोध्येत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्या नगरीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सुरक्षा यंत्रणांनीही जय्यत तयारी केली आहे. विश्व हिंदू परिषद २५ नोव्हेंबर रोजी हुंकार रॅली काढणार आहे.त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नेते अगोदरच अयोध्येत पोहचले आहेत. त्यांनी आवश्यक ती पोलीस परवानागी मिळवली आहे.

तसेच शिवसैनिकांकडून कुठल्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी हमीही भरली आहे. दरम्यान, आगामी काळात येथील वातावरण तणावपूर्ण राहील या शक्यतेनेे दोन्ही शहरांतील लोक चिंतेत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम कुटुंबांनी अन्नधान्याचा आतापासूनच साठा करण्यास सुरुवात केली आहे.तसेच अयोध्या आणि फैजाबादेतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अयोध्येत सीआरपीएफ आणि ’पीएसी’सह उत्तर प्रदेश पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाच जन्मभूमी परिसरात जाण्यास परवानगी आहे, असे विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांनी सांगितले. तत्पूर्वी, अयोध्या आणि फैजाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

एसआरपीएफच्या ४८ कंपन्या

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फैजाबाद येथे एसआरपीएमच्या ४८ कंपन्या दाखल करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी अयोध्या शबराची आठ झोन आणि १६ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बंदोबस्तासाठी सोयीस्कर होणार आहे. प्रत्येक झोनमध्ये पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांची फौज तैनात केली आहे. यामध्ये पाच एसपी, पंधरा अप्पर पोलीस अधीक्षक आणि दोन आयपीएस अधिकारी असणार आहेत. त्याच बरोबर खबरदारीचे उपाय म्हणून सीआयडीचे अधिकारी साध्या वेशात तैनात आहेत. हा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे पूर्ण अयोध्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण आल्याने तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

सुरक्षाव्यवस्थेत वाढ

सध्या अयोध्येला सुरक्षा व्यवस्था वाढलेली असून शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. ड्रोन कॅमेराने लक्ष ठेवण्यात येत असून राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा आहे.

- Advertisement -

शिवसैनिकांचा ड्रेसकोड

नाशिकहून अयोध्येला जाणार्‍या शिवसैनिकांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. पांढर्‍या रंगाच्या टीशर्टवर पुढच्या बाजूला ’चलो अयोध्या’चा नारा आणि श्रीरामाची प्रतिमा, तर मागील बाजूला बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो, आपापल्या जिल्ह्याचे नाव आहे. अयोध्येत गेल्यावर सर्व शिवसैनिक एकसंध दिसावेत, यासाठी ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. टोपीवर एका बाजूला जिल्ह्याचे नाव आणि दुसर्‍या बाजूला जय श्रीरामचा नारा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -