गडकिल्ले बचाव आंदोलन

जंजीरे वसई किल्ल्यावर शेकडो दुर्गसंवर्धक धडकले

fort Rescue Movement

गडकिल्ल्यांची विटंबना करून त्यांचे पावित्र्य नष्ट करणार्‍यांना आळा घालण्यासाठी दुर्गसंवर्धक आणि दुर्गमित्रांनी दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले.महाराष्ट्रातील सर्वच गडकोटांवर मद्याच्या पार्ट्या केल्या जातात. प्रि-वेडींगच्या नावाखाली अश्लिल छायाचित्रण केले जाते. किल्ल्यांसाठी रक्त सांडणार्‍या शुरवीरांच्या अपमानासह पावित्र्यही नष्ट होत आहे.हे प्रकार पुरातत्व विभागाच्या डोळ्यादेखत केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.याउलट गडकोट, किल्ल्यांची सफाई करणार्‍या,त्यांचे महत्व कथन करणार्‍या दुर्गमित्रांना किल्ल्यात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे.आता तर नवीन फतवा काढून पुरातत्व विभागाने किल्ल्यांवर भगवा झेंडा लावण्यास मनाई केली आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धकांनी वसई किल्ल्यातील पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर 15 आणि 16 डिसेंबर असे दोन दिवस धरणे धरले होते.त्यात राज्यातील 35 संघटना सहभागी झाल्या होत्या.यावेळी पुरातत्व विभाग आणि वन,पर्यटन विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात आला.भगव्या झेंड्यावरील बंदी मागे घ्यावी, किल्ल्यांवर येणार्‍यांच्या नावांची नोंदणी करण्यात यावी,त्यासाठी पायथ्याला तपासणी चौकी उभारण्यात यावी.किल्ल्यातील अश्लिल चाळे बंद करण्यात यावेत,गडकिल्ले कचरामुक्त करावेत,किल्ल्यातील वणवे थांबवावेत.अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

त्यावर येत्या 15 दिवसांत मार्ग काढण्याचे आश्वासन पुरातत्व विभागाने दिले.त्यामुळे या आंदोलनाचे यश दुर्गमित्रांनी राजा छत्रपतींच्या पायी अर्पण केले.शिवकार्य गडकोट संस्था नाशिक, युवाशक्ती प्रतिष्ठान पालघर,शिवसेवा समिती बोरीवली,शिवशौर्य ट्रेकर्स मुंबई,रिाजा शिवछत्रपती परिवार शिरगांव,युवा प्रतिष्ठान भाईंदर,स्वामी समर्थ केंद्र सफाळे,किल्ले जाणीव गु्रुप ठाणे,किल्ले संवर्धन मोहीम केळवे,दुर्गमित्र परिवार जोगेश्वरी,स्थानिक दुर्गमित्र वसई ट्रेक क्षितीज संस्था डोंबिवली, भटकंती कट्टा जोगेश्वरी यांच्यासह अनेक संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.या आंदोलनाचे प्रास्ताविक मोहिमेचे प्रमुख डॉ.श्रीदत्त राऊत यांनी केले,तर सांगता श्रीराम खुर्दळ यांनी केले.