शहरात चार घटनेत ड्रग्ज विक्रीप्रकरणी चौघांना अटक

सुमारे सोळा लाख रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त

Mumbai
Arrested Photo
प्रातिनीधीक फोटो

शहरात चार वेगवेगळ्या घटनेत ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या चार आरोपींना अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या वांद्रे, वरळी, कांदिवली आणि आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश असून चारही आरोपींकडून पोलिसांनी सुमारे सोळा लाख रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नायजेरीन नागरिकाला अटक
अंधेरीतील फ्लायओव्हर ब्रिजजवळील सिंडीकेट बँकेजवळ काही विदेशी नागरिक एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर गुरुवारी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून चिनोन्सू उदेगू या 26 वर्षीय नायजेरीयन नागरिकाला अटक केली. त्याच्या अंगझडतीतून पोलिसांनी पाच लाख रुपयांचे 250 ग्रॅम वजनाचे एमडीचा साठा जप्त केला आहे.

गोवंडीतील असगरअली ताब्यात
चिनोन्सू हा नालासोपारा येथे राहत असून अंधेरी परिसरात तो एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आला होता. या कारवाईपूर्वी आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍यांनी कुर्ला येथील कल्पना सिनेमागृहाजवळील लाला कंपाऊंड परिसरातून असगरअली अन्वरलुलूस शेख या 42 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 1 किलो 150 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या चरसची किंमत पावणेसहा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. असगरअली हा गोवंडीतील शिवाजीनगरचा रहिवाशी आहे.

चरसची विकणारा सलीम गजाआड
ही कारवाई ताजी असतानाच कांदिवली युनिटच्या अधिकार्‍यांनी अशाच एका कारवाईत 750 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. या गुन्ह्यांत सलीम हबीब खान ऊर्फ सलीम टेम्पो याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. सलीम हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून तो गुरुवारी 270 क्रमांकाच्या बसस्टॉपजवळ चरसची विक्रीसाठी आला होता.

एमडीएमए ड्रग्ज जप्त

चवथ्या कारवाई वरळी युनिटच्या अधिकार्‍यांनी लक्ष्मण राजन पोंडुकोडे ऊर्फ राजन ऊर्फ निखील या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळ त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 62 हजार रुपयांचे 81 एसएलडी पेपर आणि 77 हजार रुपयांचे एमडीएमए नावाचे ड्रग्ज जप्त केले आहे. या चारही आरोपींविरुद्ध ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here