घरमुंबईपालघरमध्ये चार शिवसेना, दोन भाजप

पालघरमध्ये चार शिवसेना, दोन भाजप

Subscribe

विधानसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित,विक्रमगडमध्ये हेमंत सवरा,तलासरीत पास्कल धनोरेंना पुन्हा संधी,पालघरमध्ये आमदार अमित घोडांऐवजी श्रीनिवास वनगा,नालासोपार्‍यात प्रदीप शर्मा

लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून आणलेल्या शिवसेनेला पालघरमध्ये युतीच्या कोट्यातून विधानसभेच्या चार जागा मिळण्याची शक्यता असून भाजपा आपल्याकडे असलेल्या विद्यमान आमदारांचा दोनच जागांवर लढणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू अशा विधानसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी वसई, नालासोपारा, बोईसर बहुजन विकास आघाडीकडे आहेत. तर डहाणू आणि विक्रमगडमध्ये भाजपाचे आमदार आहेत. पालघरमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. सध्या युतीच्या जागावाटपात पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघर या चार जागा शिवसेनेच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. तर भाजपा डहाणू आणि विक्रमगड विधानसभा लढणार आहे. युती होणारच ही शक्यता गृहीत धरून जागा वाटपाचे हे सूत्र तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालघर जिल्ह्यातील आपली ताकद लक्षात घेऊन भाजपाने याठिकाणी माघार घेत शिवसेनेकडून महाराष्ट्रात इतर ठिकाणी जागा वाढवून घेण्याची व्यूहरचना आखली आहे.

- Advertisement -

डहाणू आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतली होती. विक्रमगडचे प्रतिनिधीत्व करणारे विष्णू सवरा आदिवासी विकास आणि पालकमंत्री असूनही जिल्ह्यात पक्ष वाढीत अपयशी ठरले होते. परिणामी त्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला होता. डहाणूचे भाजपाचे विद्यमान आमदार पास्कल धनोरे जिल्हाध्यक्षही आहेत. पण, तेही सर्व पातळीवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे धनोरे आणि सवरा यांच्याबद्दल पक्षातूनच नाराजीचा सूर आहे.

असे असले तरी भाजपाकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. माजी पालकमंत्री विष्णू सवरा विक्रमगड विधानसभेचे आमदार आहेत. निष्क्रीय असा ठपका असलेल्या सवरा यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला होता. आपले पूत्र डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळावी यासाठी सवरा प्रयत्नशील आहेत. तर राष्ट्रवादीचे सुनील भुसारा हेही भाजपमधून विक्रमगड मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेटीगाठीही झाल्या आहेत. पण, त्यांच्याबाबतीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या नावाचीही चर्चा आहे.

- Advertisement -

पालघरमध्ये शिवसेनेचे अमित घोडा आमदार आहेत. मात्र, त्यांच्यावर पक्षातूनच प्रचंड नाराजी आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना आमदार करू असे वचन दिले आहे. त्यामुळे पालघरमधून वनगा यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. बोईसरमधून डॉ. विश्वास वळवी, जगदीश धोडी आणि कमळाकर दळवी इच्छुक आहेत. त्यामध्ये सध्यातरी वळवी यांचे नाव आघाडीवर आहे. नालासोपारा मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून याठिकाणी चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

वसईतून विवेक पंडित पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, सध्या ते भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढण्याची पंडित यांची भूमिका आहे. आमदार आणि उपनेतेपद भूषवलेल्या पंडितांनी सेनेच्या वाढीसाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा त्यांना प्रखर विरोध आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टीन यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुुरु केली आहे. ख्रिस्ती उमेदवार देऊन महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांमध्ये सहानुभूती घेण्याची सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची व्यूहरचना आहे.

पालघरमध्ये चार शिवसेना, दोन भाजप
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -