Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई बोरिवलीच्या नॅशनल पार्कात कोल्ह्यांचे दर्शन

बोरिवलीच्या नॅशनल पार्कात कोल्ह्यांचे दर्शन

डिसेंबरमध्ये नागला, तुळशी येथे कॅमेर्‍यामध्ये टिपले

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या आसपासच्या कांदळवनात अनेकदा जखमी कोल्हे सापडले आहेत. मात्र, बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रथम कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. डिसेेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नॅशनल पार्कच्या नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्यांची छायाचित्रे वनविभागाकडून टिपण्यात आली आहेत. वनविभागाने टिपलेली छायाचित्रे म्हणजे राष्ट्रीय उद्यानात कोल्ह्यांचा अधिवास असल्याचा पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे.

मुंंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी, भांडुप, पश्चिम उपनगरातील गोराई-मनोरी आणि अंधेरी लोखंडवाला भागात तर नवी मुंबईतील कांदळवनात अनेकदा कोल्हे दिसून आले आहेत. विक्रोळीच्या गोदरेज परिसरात अनेकदा कोल्हेकुई ऐकायला मिळते. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमध्येही यापूर्वी जखमी कोल्हे सापडले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 2015 पासून सातत्यपूर्ण कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात येते. परंतु कोल्ह्यांचे कधीच दर्शन झाले नाही किंवा त्याचा वावर असल्याचे छायाचित्रही कॅमेर्‍यामध्ये कधीच टिपण्यात आले नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नॅशनल पार्कातील नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्यांचा वावर कॅमेर्‍यात टिपण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

२३ डिसेंबरला नागला वनपरिक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये कोल्ह्याचे छायाचित्र टिपल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. त्याच दिवशी तुळशी वनपरिक्षेत्रातही कोल्ह्याचे दर्शन झाले. तुळशी वनपरिक्षेत्रात गस्तीदरम्यान गाडीच्या समोरून जाणार्‍या कोल्ह्याचा व्हिडिओ वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. वर्सोवा खाडीपलीकडे राष्ट्रीय उद्यानाचे १ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले नागला वनपरिक्षेत्र आहे. कांदळवनाला लागून हे परिक्षेत्र असल्याने तेथूनच हा कोल्हा आला असण्याची शक्यता राजेंद्र पवार यांनी वर्तवली. मात्र, तुळशी वनपरिक्षेत्रात दिसलेल्या कोल्ह्याविषयी अंदाज बांधणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 2015 पासून सातत्याने कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात येत आहे. मात्र, प्रथमच आम्हाला राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील कॅमेर्‍यामध्ये कोल्ह्याचे छायाचित्र टिपले गेले आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील कोल्ह्याचा नवा अधिवास असल्याचा हा पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे.
– जी. मल्लिकार्जुन, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

- Advertisement -