घरमुंबईम्हाडाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

म्हाडाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

म्हाडाचे नावाने फसवणूक करण्याच्या घटनेत सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील घटनेत लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप.

दादर येथील खेडगल्लीत असलेल्या म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे दहा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध दादर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष रविंद्र पाटील हे ३३ वर्षांचे तक्रारदार दादर येथील सेनापती बापट मार्गावरील बीएमसी टेनामेंटमध्ये राहतात.

अशी घडली घटना

दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यांत त्यातील दोन आरोपींशी त्यांची ओळख झाली होती. या दोघांनी त्यांची म्हाडा कार्यालयात ओळख असल्याची बतावणी करुन त्यांना दादरच्या खेडगल्लीतील म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. आशिष पाटील हे म्हाडाच्या फ्लॅटसाठी इच्छुक असल्याने त्यांनी त्यास तयारी दाखवून त्यांच्याशी व्यवहार केला होता. प्रभादेवी येथील प्रार्थना हॉटेलमध्ये या दोघांनी त्यांच्या इतर चार सहकार्‍यांच्या मदतीने त्यांच्याकडून सुमारे ३१ लाख रुपये घेतले होते. डिसेंबर २०१६ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत ही रक्कम आरटीजीएस आणि कॅश स्वरुपात देण्यात आली होती. ही रक्कम मिळाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी म्हाडाच्या फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देण्यात आली होती. मात्र कागदपत्रे मिळवूनही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. त्यातच त्यांना आरोपींनी दिलेले म्हाडाच्या फ्लॅटचे सर्व दस्तावेज बोगस असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरोपींकडून त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. सतत केलेल्या मागणीनंतर या आरोपींनी त्यांना २१ लाख रुपये दिले, मात्र दहा लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच पुन्हा पैशांची मागणी केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर आशिष पाटील यांनी सहाही आरोपींविरुद्ध दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या सहाही आरोपींविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ (२) भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. लवकरच सहाही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांची जबानी नोंदवून नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे अन्य काहींना म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -