पालिका रुग्णालयातील नवजात बालकांना मोफत किट्स मिळणार!

केडीएमसीचा स्तुत्य निर्णय

Mumbai
KDMC
केडीएमसी मुख्यालय

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात प्रसुती झालेल्या नवजात बालकांना मोफत किट्स देण्याचा निर्णय मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. पालिकेच्या या निर्णयाचे सर्वत्रच स्वागत होत आहे.

महापालिकेची कल्याणात रुक्मिणीबाई व डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन रुग्णालये आहेत. या दोन्ही रुग्णालयात दरवर्षी सरासरी 3500 महिलांची प्रसूती होते. पालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या महिला गरीब व साधारण कुटुंबातील असतात. त्यामुळे किट्स घेण्याइतपत त्यांची आर्थिक कुवत नसते. त्यामुळेच पालिकेने किट्स पुरविण्याचा निर्णय पालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला होता. त्या निर्णयावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब करीत सुमारे 50 लाखांची तरतूद केली आहे. यावेळी मुरबाडकर बिझनेस इंडस्ट्रीजला प्रत्येक किट्सचे पाच हजार रुपये देऊन हा ठराव मान्य करण्यात आला. नामांकित कंपनीचे उत्पादित उत्पादने किट्समध्ये असावीत असे आदेश सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले. पालिकेच्या या निर्णयामुळे सामान्य कुटुंबीयांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

काय आहे किट्समध्ये
या किट्समध्ये झबला, नँपी,टोपी, बेबी, ब्लँकेट, हिवाळी सेट, बेबीचे अंथरुण, टॉवेल, दुपट्टा, मच्छरदाणी, ऊशी, बेबी पावडर, बेबी सोप, शतावरी पावडर, मसाज तेल, बेबी लोशन, बेबी सॅनिटरी पॅड्स, फिडिंग बॉटल, नेलकटर, फिडिंग गाऊन, किटबॅग ,अँटी सेफ्टिक औषधे, निओस्पोरिन अँटिबायोटिक पावडर, प्लास्टिक शिट अशा 20 वस्तूंचा संच असणार आहे.