घरमुंबईप्रकाश आंबेडकर नक्की लढणार कुठून?

प्रकाश आंबेडकर नक्की लढणार कुठून?

Subscribe

चर्चा तर भरपूर, पण मतदारसंघ अजून ठरेना!

लोकसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या आतापर्यंतच्या २ याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनपर्यंत आघाडीचे प्रणेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याचा सस्पेन्स कायम आहे. आता तर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी? यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वत:च संभ्रमावस्थेत आहेत की काय?, असे देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

दोन याद्या जाहीर करण्यासाठी पक्षाकडून दोनदा पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, दोन्ही वेळा ‘मी कुठून लढणार, ते पुढच्या यादीत कळेल’, असे म्हणून प्रकाश आंबेडकरांनी विषय टोलावला आहे. मात्र, अजूनही त्यांचा मतदारसंघ निश्चित झालेला नाही. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढवणार’, असे जाहीर केल्याचे सांगितले जात होते. पक्षाकडून मात्र, या वृत्ताचा इन्कार करत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

भारिप बहुजन महासंघाने आतापर्यंत ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये काही मुंबईतील मतदारसंघांचा देखील समावेश आहे. मात्र, उरलेल्या ११ मतदारसंघांमध्ये खर्‍या अर्थाने क्लिष्ट मतदारसंघ शिल्लक आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर, मुंबईतील तीन मतदारसंघ यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये बी.जी. कोळसे पाटलांना आधी पाठिंबा आणि नंतर एमआयएमच्या दबावामुळे रद्द झालेली आघाडी यामुळे हा मतदारसंघ सध्या आघाडीत हॉट टॉपिक झाला आहे. त्यातही प्रकाश आंबेडकरांनी नक्की कुठून निवडणूक लढवावी? याचा निर्णय अद्याप पक्षाला घेता आलेला नाही. अकोल्यामध्ये भारिपचा पारंपरिक मतदार असल्यामुळे तिथूनच त्यांनी निवडणूक लढवावी असे पक्षातल्या एका गटाचे म्हणणे आहे. मात्र, एक गट सोलापूरच्या मतदारसंघासाठी आग्रही आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: देखील ‘सोलापूरचा शोलापूर करू’ असे सांगत तसे संकेत दिले होते. मात्र, पुन्हा नागपूर आणि दक्षिण मध्य मुंबई या पर्यायांची चर्चा सुरू झाली. स्वत: आंबेडकरांनी ‘मी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवू शकतो’, असे सांगत ही चर्चा अजूनच वाढवली.

अजून प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघाचा निर्णय झालेला नसून नागपूर, अकोला आणि सोलापूर ही नाव चर्चेत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत त्याची रितसर घोषणा होईल.
– अशोक सोनावणे, प्रदेशाध्यक्ष, भारिप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -