फुटओव्हर ब्रिजसाठी विद्यार्थ्यांकडून मदतनिधी; कामाला अद्याप सुरुवात नाही

अंबरनाथ पश्चिम येथील सुभाषवाडी परिसरात फातिमा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटओव्हर ब्रिजसाठी मदतनिधी जमा केला आहे. मात्र, तरी देखील शाळा प्रशासनाने फूटओव्हर ब्रिजचे काम केले नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai
fundraising initiative for Foot Over Bridge from fatima School Students at ambernath
विद्यार्थी फुटओव्हर ब्रिजच्या प्रतिक्षेत

अंबरनाथ येथील फातिमा शाळेसमोर वर्दळीचा रस्ता असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडने जोखमीचे झाले आहे. यावर पर्याय म्हणून शाळा प्रशासनाने फूटओव्हर ब्रिजचा उपाय सुचविला होता. याकरता शालेय विद्यार्थ्यांकडून यासाठी पैसे देखील घेण्यात आले होते . मात्र, अनेक वर्षे झाली तरी ब्रिजच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रस्ता ओलंडाताना होत आहेत अपघात

अंबरनाथ पश्चिम येथील सुभाषवाडी परिसरात फातिमा हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून या शाळेत ५ ते ६ हजार इतकी विद्यार्थ्यांची संख्या आहे . या शाळेसमोर चिंचपाडा आणि अन्य परिसरात जाणारा मुख्य रस्ता असून हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. शालेय विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडून जाण्याची कसरत करावी लागते. शिवाय शाळेतून शाळेच्या मैदानात जाण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून जावे लागते. अनेक वेळा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात देखील या ठिकाणी झाले आहेत.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शाळा प्रशासनाने शाळेसमोर फुटओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला होता.
२०१६ – १७ दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांकडून मदतनिधी जमा केली होती. यात पालकांनी ५०० ते १ हजारहून अधिक निधी ज्यांच्या त्यांच्या मर्जीने दिला होता. मात्र, हे पैसे घेतल्यानंतर सुद्धा ब्रिजच्या कामाला सुरुवात झालेली नाही. शाळेसमोरील रस्ता हा नगरपालिकेच्या हद्दीतील असल्याने त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, नगरपालिका प्रशासनाने अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे सांगितले. तर स्थानिक नगरसेविकेने देखील असा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, असे सांगितले आहे.

फुटओव्हर ब्रिजचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून केले जाऊ शकते . विद्यार्थ्यांना आणि पालकांना यासंदर्भात वेठीस धरणे चुकीचे आहे. आमच्याकडे अनेक पालकांच्या तक्रारी केल्या आहेत. शाळेने ब्रिजचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा जमा केलेले पैसे पालकांना परत द्यावेत.  – विजय मौर्य; स्टुडंट पॉवर संघटना

विद्यार्थ्यांकडून मदतनिधी आम्ही जमा केलेला आहे. ते पैसे सुरक्षित आहेत. ज्याप्रमाणे एम.एम.आर.डी.ए च्या माध्यमातून स्कायवाक बनविण्यात येतात त्या प्रमाणे फुटओव्हर ब्रिज बनविता येईल, अशी आमची संकल्पना होती त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.  – लिसडन मॅडम; उपमुख्यध्यापिका


हेही वाचा – HSC, SSC Exams : १०वी, १२च्या परीक्षांच्या तारखा जाहीर!