घरगणपती उत्सव बातम्या'हे गणराया' आमचे विघ्न दूर कर... कलाकारांचे साकडे रोजगाराअभावी उपासमारीची वेळ

‘हे गणराया’ आमचे विघ्न दूर कर… कलाकारांचे साकडे रोजगाराअभावी उपासमारीची वेळ

Subscribe

कोणतेही संकट हे विघ्नहर्त्या गणरायासमोर फार काळ टिकत नाही. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कलाकारांवरील विघ्न हे गणरायालाही दूर करता आले नाही. सार्वजनिक मंडळ व घरगुती गणपतीच्या मूर्तींचा आकार लहान झाल्याने गणेशमूर्ती घडवणे, मूर्तीवर हिरेजडित काम करणे, गणेशोत्सवादरम्यान मूर्तीला दररोज धोतर नेसवणे, आगमन-विसर्जन मिरवणुकीसाठी रथ सजवणे अशा माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत असतो. परंतु यंदा कोरोनामुळे गणेशाच्या मूर्तीपासून उत्सवावरच निर्बंध आणले आहेत. गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकच येणार नसल्याने मंडळांकडूनही फारशा आकर्षक गणेशमूर्ती बनवण्यात येत नाहीत. त्यामुळे या कलाकारांची परिस्थिती बिकट झाली आहे. २२ ऑगस्टला गणेशाचे आगमन होणार असले तरी गणरायाने त्याच्या आगमनाबरोबरच आमच्यावरील संकट दूर करून आमच्या आमच्या हाताला काही तरी काम देऊन विघ्न दूर कर अशी प्रार्थना कलाकारांकडून करण्यात येत आहे.

प्रवीण लिगम

१० मूर्तींचे कामही मिळाले नाही

गणणायावर लावण्यात येत असलेल्या हिरे, रत्न यामुळे मूर्ती आकर्षक दिसते. गणरायाच्या मूर्तीला अधिकाधिक हिरे, रत्न लावण्यात यावेत, अशी गणेशोत्सव मंडळांची मागणी असते. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सावर आलेल्या निर्बंधामुळे भाविकांची दर्शनाला गर्दी नसणार आहे. त्यामुळे मंडळांनी साध्या मूर्ती बनवण्याला प्राधान्य दिले आहे. साध्या मूर्तींवर हिरे, रत्नाचे काम फारसे करण्यात येत नसल्याने मूर्तीला हिर्‍यांनी सजवणार्‍या कलाकारांच्या हाताला कामच मिळाले नाही. लालबाग-परळमध्ये गणेशमूर्तीवर डायमंड वर्क करण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रवीण लिगम १० वर्षांपासून हे काम करत आहेत. दरवर्षी त्यांच्याकडे २० ते २२ सार्वजनिक मंडळ तर ८० ते ९० घरगुती गणपतीच्या मूर्ती डायमंड वर्कसाठी येतात. यामध्ये दोन फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी तीन हजार घेतात. मोठ्या मूर्तींच्या मुकुटाला हिरे व रत्न लावण्यासाठी १५ ते १७ हजार तर मूर्तीच्या हातातील कडे, बाजूबंध, कान, सोंड यांना हिरेजडित करण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये मिळतात. यातून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपये सुटतात. परंतु यंदा अवघ्या १० मूर्तीही डायमंड वर्कसाठी आल्या नाहीत. त्यातीलही काही मूर्तीही या जवळच्या लोकांच्या आहेत. आमच्याकडे काम करण्यासाठी येत असलेले मुलेही बसून आहेत. ते काम द्या अशी मागणी करत आहेत. परंतु कामच नसल्याने आम्ही निरुत्तर आहोत. काम नसल्याने रात्रभर झोप लागत नाही. नसल्याचे प्रवीण लिगम यांनी सांगितले.

- Advertisement -
हर्षद खोत
हर्षद खोत

कामाअभावी फुलांची सजावट ठप्प

दरवर्षी गणरायाचे आगमन व विसर्जन हे मोठ्या उत्साहात केले जाते. यासाठी अनेक मोठ्या मंडळांबरोबरच घरगुती गणपतींची मिरवणुकीसाठी आकर्षक रथ आणि पाटपूजनाच्या कार्यक्रमाला फुलांची सजावट केली जाते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे ही फुलांची सजावट करणार्‍या कलाकारांनाही मोठा फटका बसला आहे. अभ्युदय नगरचा राजा, अभ्युदय नगरचा गणराज, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या गणेश मंडळांच्या पाटपुजनाला तसेच आगमन, विसर्जनावेळी फुलांची भव्य आरास करण्यात येते. मुंबईतील मोठमोठ्या गणपतींना फुलांची आरास करणार्‍या रोज अ‍ॅण्ड पेटल फ्लोरिस्टचे हर्षद खोत यांची दरवर्षी ८ ते १० लाखांची उलाढाल असते. मोठ्या गणपतींची ट्रॉली सजवण्यासाठी किमान ४ ते ५ लाख रुपये लागतात. तर घरगुती गणपतींसाठी ४ ते ५ लाख अशी दरवर्षी ८ ते १० लाखांची उलाढाल होत असते. एका ट्रॉलीला सजवण्यासाठी ३० ते ३५ जणांची टीम तर घरगुती गणपतींसाठी २० जणांची टीम काम करते, अशी ५० जणांची टीम हर्षद खोत यांच्याकडे काम करत आहे. परंतु कोरोनामुळे गणेशोत्सव मंडळांनी आखडता घेतलेला हात आणि फुलांचे वाढलेले दर यामुळे फुलांची सजावट करण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच फुलांची सजावट करणारे बहुतांश कामगार हे पश्चिम बंगालमधील आहेत. त्यामुळे फुलांची सजावट करण्यासाठी कामगारांकडून तीन दिवसांसाठी १५ ते २० हजार रुपये मजूरी घेतली जात असे परंतु यावर्षी कामगारांची तुटवडा असल्याने उपलब्ध असलेल्या कामगारांनीही मजूरी दुप्पट केल्याचे खोत यांनी सांगितले.

रुपेश पवार

वर्ष कसे काढायचे

गणपती मूर्तींना पितांबर नेसवणार्‍या या काळामध्ये प्रचंड मागणी असते. पितांबर नेसवणार्‍यांचा वर्षभरातील कमाई गणेशोत्सव काळात होत असते. परंतु कोरोनामुळे यंदा पितांबस नेसवणार्‍या कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईतील २०० ते २५० गणपतींना पितांबर नेसवणार्‍या लालबागमधील रुपेश पवार यांनी यावर्षी एकाही मूर्तीला पितांबर नेसवण्याचे काम आले नसल्याचे सांगितले. गणपतीच्या मूर्तीनुसार पितांबर नेसवण्याचा दर आकारला जातो. एका दिवसाचा हा दर ३ हजारांपासून २० हजारांपर्यंत असतो. बहुतांश गणपतींचा कारखान्यातच पितांबर नेसवण्यात येते. परंतु काही मंडळे ही दररोज पितांबर बदलत असतात. यामध्ये लालबागचा राजा, फोर्टचा राजा, माझगावचा श्रीनिवास, गिरगावातील कुडाळेश्वर, भांडुपमधील मराठा मित्र मंडळ यासारखे पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक मंडळे ही दररोज पितांबर बदलत असतात. यामुळे पितांबर नेसवण्याच्या या उद्योगामध्ये गणेशोत्सवाच्या काळात ७ ते ८ लाखांची उलाढाल होत असते. परंतु यंदा सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चार फुटापर्यंतच मूर्ती बसवणे बंधनकारक केले आहे. त्यातच अनेक मंडळांनी मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याने पितांबर नेसवण्याच्या ऑर्डर आल्या नाहीत. त्यातच पुढील वर्षापासून मातीच्या मूर्ती केल्यास आमच्यासारख्या कलाकारांवर देशोधडीला लागण्याची वेळ असा उद्रेक रुपेश पवार यांनी व्यक्त केला.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -