घरCORONA UPDATEसार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच!

सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच!

Subscribe

गणरायाचं आगमन पुढील महिन्यात होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश देत आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जाऊ नयेत, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत शासनाने गणेशोत्सवाबाबत परिपत्रक जारी केले असून त्याआधारे मुंबई महापालिकेनेही गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना मंडपाच्या शेजारील कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यंदा समुद्र चौपाट्यांच्या पारंपारिक विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती विसर्जन होणार नाही. ‘गणरायांच्या मूर्ती विसर्जनाचा भार यंदा कृत्रिम तलावांवरच’ अशा आशयाचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम दिले होते.

मुंबईत गिरगाव, दादर, शिवाजीपार्क, जुहू आदी चौपाट्यांसह ८४ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. यासह मुंबईतील ३४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते. परंतु कोरोना कोविड १९च्या पार्श्वभूमीबाबत सुरक्षिततेचा उपाय म्हणून गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यावर्षी गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांचे आयोजन न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देताना प्रतिज्ञापत्रकांमध्ये सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट घातली आहे. मात्र, कृत्रिम तलावांत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करताना मंडळाचे १० पेक्षा अधिक लोक उपस्थित असणार नाहीत आणि मिरवणूक काढली जाणार नाही, अशा प्रकारचे हमी पत्रही लिहून घेतले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी एम-पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच यासाठी प्रशासनाने भरीव निधीची तरतूद करावी, अशीही सूचना केली होती. घाटकोपरमधील शिवसेना नगरसेविका अश्विनी दीपक हांडे यांनी आपल्या प्रभागातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे.

राज्य सरकारनेही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मार्गदर्शन सूचना जारी करताना यावर्षी महापालिका, विविध मंडळे गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. याबरोबरच शक्यतो यावर्षी पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. तसेच मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यात यावे. तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी किंवा भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन आणि विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: आणि कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल, असे नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -