घरगणपती उत्सव बातम्याबाप्पा चालले टेक्सासला !

बाप्पा चालले टेक्सासला !

Subscribe

गणेशोत्सवाच्या तयारीचे पडघम वाजू लागले आहेत. हा उत्सव केवळ राज्य आणि देशापुरता मर्यादित राहिलेला नसून परदेशात तो मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीचे पडघम वाजू लागले आहेत. हा उत्सव केवळ राज्य आणि देशापुरता मर्यादित राहिलेला नसून परदेशात तो मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. यावर्षी टेक्सासमधील एकता मंदिरात बसवण्यात येणारी बाप्पाची मूर्ती थेट नवी मुंबईतून पाठवण्यात आली आहे.

ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनवण्यात आली आहे. नवी मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार संदीप गजकोष यांनी ही मूर्ती साकारली आहे. इको फ्रेंडली असलेली ही मूर्ती तब्बल सहा फुटांची आहे. नवी मुंबईतील न्हावा-शेवा डॉकमधून जलमार्गे मूर्ती अमेरिकेतील टेक्सास येथे पाठवण्यात आली आहे. ही मूर्ती पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती आहे. सोबतच या मूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फेटे, पेशवाई फेटेसुद्धा पाठविण्यात आले आहेत. अमेरिकेतील टेक्सास शहरात असणार्‍या डीएफडब्ल्यू हिंदू टेम्पल सोसायटीसाठी ही मूर्ती साकारण्यात आली आहे. परदेशात गेली अनेक वर्षे ही संस्था कार्यरत आहे. भारतातील प्रत्येक सण ही संस्था उत्साहात साजरा करत आहे.

- Advertisement -

या संस्थेचे सदस्य दिपेश शाह यांनी सोशल मीडियामार्फत संदीप गजकोष यांच्याशी संपर्क साधला आणि या मूर्तीची मागणी केली होती. मूर्तिकार संदीप गजकोष यांनी साधारण १ महिना परिश्रम करून ही मूर्ती साकारली आहे. पीओपी पर्यावरणाला हानिकारक असल्यामुळे ही मूर्ती फक्त कागदी लगद्यापासून बनवण्यात आली आहे. त्यासाठी फक्त सफेद कागदाचा वापर करण्यात आला आहे. या सोबतच मूर्ती सुरेख दिसावी म्हणून आकर्षक मोतीकाम करण्यात आले आहे. हे काम संदीप यांची पत्नी जयश्री यांनी केले आहे.


  • परदेशातील भारतीय नागरिक पारंपरिक वेशात बाप्पाचे स्वागत करतात. त्यामुळे मूर्तीसोबतच तिथल्या नागरिकांसाठी कुर्ते, फेटे, लेझीमसाठी लागणारी झांज यासारख्या काही वस्तू परदेशी पाठवल्या जातात.

  • मुंबईतील अनेक मंडळांसाठी संदीप यांनी मूर्ती साकारल्या आहेत. यामध्ये बाळ क्रीडा मंडळ, कल्पतरू मित्र मंडळ, सोनाक्षी मित्र मंडळ यांसारख्या अनेक मंडळांचा समावेश आहे. या सोबतच कागदी लगद्यापासून घरगुती मूर्तीसुद्धा बनवतात. या सोबतच कॅनडा,मॅारिशस अशा वेगवेगळ्या देशातसुद्धा मूर्ती पाठविण्यात येतात.

  • गणेशोत्सव संपल्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे बाप्पाच्या विसर्जनासाठी टेक्सासमधील शासनाकडून वेगळी परवानगी घेण्यात आली आहे.

 

टेक्सासमध्ये राहूनदेखील आम्ही भारतातील सर्व सण त्याच उत्साहात साजरे करतो. देशापासून लांब राहूनही आपल्या देशातील परंपरा आणि संस्कृती याविषयी सर्वाना माहीत असले पाहिजे. 
– दिपेश शाह, सदस्य, डीएफडब्ल्यू हिंदू टेम्पल सोसायटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -