राज्यात बाप्पाच्या विसर्जनाची लगबग; मुंबईत १२९ ठिकाणी होणार विसर्जन

पोलीस आणि महानगरपालिकेच्या जोडीला काही खासगी संस्थाही मदतीसाठी सज्ज झाल्या असून पालिकेच्यावतीने धोकादायक ब्रीजवरून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका न काढण्याच्या विशेष सुचना

Mumbai

मुंबई तसेच पुणे, नाशिकमधील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच वाजत-गाजत निरोप द्यायला सुरूवात झाली आहे. मुंबई तसेच पुण्यात गणेश भक्तांसह ढोल-पथकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून एकच लगबग दिसून येत आहे. दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणताही गैर व्यवहार, गैर प्रकार घडू नये, बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे याकरिता पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.


हेही वाचा – बापाच्या विसर्जनाला कडेकोट बंदोबस्त


मुंबईतील वेगवेगळ्या १२९ बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेकडून ३२ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्थादेखील याठिकाणी करण्यात आली आहे.

विसर्जनाकरिता काही मार्गात बदल

१२५ हून अधिक विर्सजनाची ठिकाणी असून विर्सजनाच्या दिवशी या ठिकाणीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले. गिरगाव, शिवाजीपार्क, मालाडच्या मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवईतील गणेश घाट या पाच महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. काही मार्गात बदल करण्यात आले आहे. यावेळी वाहतुकीला काही रस्ते बंद ठेवण्यात आले असून काही ठिकाणी एक दिशा मार्ग, तेरा ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

धोकादायक ब्रीजवरून विसर्जन मिरवणुका न काढण्याच्या सुचना

पोलीस आणि महानगरपालिकेच्या जोडीला काही खासगी संस्थाही मदतीसाठी सज्ज झाल्या असून पालिकेच्यावतीने धोकादायक ब्रीजवरून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका न काढण्याच्या विशेष सुचना दिल्या आहेत. दरम्यान, गणपती विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी ५० हजार पोलीस तैनात करण्यात आले असून पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी देखील तैनात करण्यात आली आहे.

५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार प्रत्येक ठिकाणांवर नजर

५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सुरक्षेसाठी काही पोलीस साध्या वेशातदेखील तैनात करण्यात आले आहेत. यावेळी मुंबईतील ५० ते ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असून वाहतुककोंडी होऊ नये, याकरिता विसर्जन मिरवणूक आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबईतील मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ९९ ठिकाणी पार्किंगही बंद करण्यात आली आहे.