‘त्या’ गॅसची कारणमिमांसा शोधणार आयआयटी-निरी

मुंबई उपनगरांतील काही परिसरांमध्ये वायू गळतीसंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींच्या सर्वकष कारणमिमांसा शोधण्यासाठी आयआयटी आणि निरीसह अन्य संस्थांची महापालिका प्रशासनाने निवड केली आहे.

Mumbai
'Gas Leakage' Creates Panic Across Mumbai, Fire Engines Deployed to Find Source of Unknown Odour
गॅसची गळती

दोन दिवसांपूर्वी मुंबई उपनगरांतील काही परिसरांमध्ये वायू गळतीसंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींच्या सर्वकष कारणमिमांसा शोधण्यासाठी आयआयटी आणि निरीसह अन्य संस्थांची निवड महापालिका प्रशासनाने केली आहे. तसेच या घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसेच भविष्यात उपाय योजना करण्यासाठी एक विशेष गठीत करण्याचेही निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

भविष्यातील उपाययोजनांसाठी विशेष समिती

मुंबई उपनगर परिसरामध्ये वायूच्या वासाच्या पार्श्वभूमीवर विविध तेल आणि गॅस कंपन्यांची बैठक अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. या बैठकीला उपायुक्त (पर्यावरण) सुप्रभा मराठे, पोलिस खात्याचे उप आयुक्त  प्रणय अशोक, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, महापालिकेच्या प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त, मुंबई अग्निशमन दल, बी.पी.सी.एल., टाटा पॉवर, एच.पी.सी.एल., बी.ए.आर.सी., आर.सी.एफ., आय.ओ.सी.एल., एन.डी.आर.एफ., एम.पी.सी.बी., एम.जी.एल., ओ.एन.जी.सी., एजिस लॉजिस्टिक या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

१९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायंकाळी आणि रात्री विशेषतः चेंबूर, गोवंडी, पवई, चांदीवली, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या भागातून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास आणि मुंबई अग्निशमन दलास प्रत्येकी ३४ दूरध्वनी तक्रारी; तर मुंबई पोलिसांना १०६ नागरिकांचे दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळा वास येण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मुंबई अग्निशमन दलाच्या ९ पथकांनी विविध भागात भेट देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील विविध तेल आणि गॅस कंपन्यांना याबाबत अवगत करुन त्यांच्या स्तरावर शोध घेण्याच्या सूचना केल्या होता. सर्व तेल आणि गॅस कंपन्यांना आपली यंत्रणा अधिक सर्तक ठेवण्याचे आदेश शनिवारच्या बैठकी दरम्यान, दिले होते. तसेच शनिवारी गठीत करण्यात आलेल्या समितीने घडलेल्या घटनेचा सर्वंकष अभ्यास आणि पुढे अशी घटना घडल्यानंतर काय उपाययोजना असावी, याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आणि सदर आराखडा येत्या २६ सप्टेंबर, २०१९ रोजी होणाऱ्या समितीच्या पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. मुंबईत अशा घटना घडल्यानंतर नागरिकांनी त्वरित महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

विशेष समिती गठीत

महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय केमिकल ऍण्ड फर्टीलायझर (आर.सी.एफ.), ‘डिश’, मुंबई पोलिस, महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.), बी.पी.सी.एल., एच.पी.सी.एल. आदींचा समावेश असणार्‍या विशेष समितीचे गठन करण्याचे निर्देशही शनिवारी डॉ. जोशी यांनी दिले आहेत.