घरCORONA UPDATEयेत्या ७२ तासांमध्ये कामावर रुजू व्हा, अन्यथा बडतर्फ करू

येत्या ७२ तासांमध्ये कामावर रुजू व्हा, अन्यथा बडतर्फ करू

Subscribe

शेवटची संधी म्‍हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्‍यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा कर्तव्‍यावर हजर राहण्‍याचे असूनही महापालिकेचे काही कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. त्यांना शेवटची संधी म्‍हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्‍यात येणार आहे. त्यामुळे या ७२ तासांमध्ये जे कर्मचारी कामावर परतणार नाही, त्या कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी नेमण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत.

‘कोरोना कोविड – १९’ या संसर्गजन्‍य आजाराची बाधा झालेल्‍या रुग्‍णांसह इतर रुग्‍णांना आवश्‍यक ते वैद्यकीय उपचार वेळच्‍यावेळी मिळणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्‍या ४ प्रमुख सर्वोपचार रुग्‍णालयांसह १६ उपनगरीय रुग्‍णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने इत्‍यादींमार्फत मुंबईकरांना अव्‍याहतपणे वैद्यकीय सेवा-सुविधा देण्‍यात येत आहेत. परंतु काही ठिकाणी वर्ग ३ व वर्ग ४ चे काही कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्‍णालयात कर्तव्‍यावर उपस्थित राहत असलेल्‍या डॉक्टर्स, नर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी यांच्‍यावर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे. परिणामी रुग्‍णालयाचे सुयोग्‍य व परिपूर्ण व्‍यवस्‍थापन करणे दिवसेंदिवस कठीण होण्‍यासह वैद्यकीय सेवा-सुविधांवर प्रतिकूल परिणाम होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्‍या प्रमुख मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे एका विशेष बैठकीचे आयोजन आज करण्‍यात आले होते. या बैठकीत रुग्‍णालयातील मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापनाबाबत सविस्‍तर चर्चा झाली. या दोन्‍ही बाबी लक्षात घेता अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्‍काळ कामावर हजर होणे गरजेचे व आवश्‍यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाद्वारे यापूर्वी अनेकदा कर्तव्‍यावर हजर राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर महापालिकेच्‍या सेवा नियमावलीनुसार उपस्थित राहण्‍याचे आदेश देखील वेळोवेळी देण्‍यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्‍तांनी गुरुवारच्या बैठकीदरम्‍यान या कर्मचाऱ्यांना शेवटची संधी म्‍हणून ७२ तासांची अंतिम नोटीस देण्‍याचे निर्देश दिले आहेत. ही नोटीस साथरोग कायद्यानुसार व आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्षे किंवा अधिक आहे आणि‍ ज्‍यांना काही आजार आहे, त्‍यांना ‘नॉन कोविड’ कामे दिली जातील, असेही सदर नोटीशीत नमूद करण्‍याचे निर्देशित करण्‍यात आले आहे. ७२ तासांची नोटीस देऊन देखील जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्‍यांना तात्‍काळ बडतर्फ करण्‍याचे व त्‍यांच्‍या जागी कंत्राटी तत्‍वावर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.

कंत्राटी पध्दतीने भरणार मंजूर पदे

तसेच मंजूर पदांपैकी जी पदे रिक्‍त आहेत, ती पदे देखील कंत्राटी तत्‍वावर भरण्‍याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यानुसार बडतर्फीमुळे रिक्‍त झालेल्‍या आणि आधीपासून रिक्‍त असलेल्‍या पदांवर कंत्राटी पद्धतीने मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन घेण्‍यासाठी सेवा पुरवठादार संस्‍थांची नियुक्‍ती करण्‍याचे निर्देश देखील महापालिका आयुक्‍तांनी गुरुवारच्या बैठकीदरम्‍यान दिले आहेत.

- Advertisement -

या बैठकीला प्रधान सचिव व महापालिकेच्‍या विशेष कार्याधिकारी मनीषा म्‍हैसकर, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) संजीव जयस्‍वाल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सर्व संबंधित ज्‍येष्‍ठ डॉक्‍टर, संबंधित सह आयुक्त तसेच  उपायुक्त,  महापालिका रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता, विभाग स्‍तरिय सहाय्यक आयुक्‍त, सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी यांच्‍यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -