एमबीए,लॉच्या अभ्यासक्रमाला आयडॉलमध्ये मुहूर्त मिळेना

Mumbai
Idol

प्रतिनिधी:- नोकरीबरोबरच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते. त्यामुळे बरेच विद्यार्थी मुंबई विद्यापीठातील आयडॉलला पसंती देतात. आयडॉलमध्ये विविध विषयांचे अभ्यासक्रम असले तरी व्यवस्थापन, कायदा आणि पत्रकारिता हे अभ्यासक्रम शिकवलेच जात नाहीत. त्यामुळे एमबीए आणि कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांचा मार्ग पत्कारावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक कोंडी टाळण्यासाठी अनेक महिन्यांपासून आयडॉलमध्ये एमबीए आणि लॉ अर्थात कायद्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्याला सिनेट सदस्यांनीही पाठिंबा दर्शवत ही मागणी उचलून धरली आहे. परंतु आयडॉलमध्ये व्यवस्थापन आणि कायद्याच्या अभ्यासक्रमाला मुहूर्त मिळत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.

नोकरी करत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून आयडॉलमध्ये व्यवस्थापन, विधी आणि पत्रकारिता हे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईमध्ये दूरस्थ शिक्षण पद्धतीने एमबीए आणि कायदा हे अभ्यासक्रम कुठेच शिकवण्यात येत नाहीत. वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत दूरस्थ शिक्षण पद्धतीने एमबीएचा अभ्यासक्रम शिकवण्यात येत होता. परंतु यावर्षी त्यांनी हा अभ्यासक्रम बंद केल्याने अनेक विद्यार्थ्यांना एमबीए करण्यासाठी परराज्यातील किंवा अन्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रम अभ्यासावे लागत आहेत. परंतु दूरस्थ शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात असलेल्या आयडॉलमध्ये जर व्यवस्थापन, विधी आणि पत्रकारिता हे अभ्यासक्रम सुरू केले तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांची ही मागणी लक्षात घेऊन सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्रव्यवहार करून हे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली आहे. हे अभ्यासक्रम सुरू केल्यास आयडॉलमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, तसेच विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळेल. त्यामुळे हे अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत यासाठी वैभव थोरात यांनी पुढाकार घेतला असून, सहा महिन्यांपासून ते याचा पाठपुरावा करत आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असलेले हे अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात आयडॉल उत्सुक नसल्याने या एमबीए आणि कायद्याच्या अभ्यासक्रमाला कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here