गिफ्टिंग कल्चरचा ट्रेंड

Mumbai
Gifts

दिवाळीचा सण म्हटला की, सगळीकडे उत्साह, जोष आणि आनंदाचं वातावरण. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदी. दिवाळीचा सण हा आता असा सण झाला आहे की, प्रत्येक जण आपल्याला यावेळी काय गिफ्ट मिळणार याची वाट पाहत असतो. शहरांमध्ये तर आता दिवाळीमध्ये गिफ्टिंग कल्चर वाढताना दिसत आहे. अगदी घरातल्यांपासून ते कॉर्पोरेट असो, सरकारी असो वा खासगी असो सगळ्याच कार्यालयातही आपल्या कर्मचार्‍यांना खूष ठेवण्यासाठी गिफ्ट्स देण्याचा एक ट्रेंडच झाला आहे. या वाढत्या गिफ्टिंग कल्चरमुळे आता बाजारामध्येही बरेच पर्याय गिफ्टसाठी निर्माण झाले आहेत.

घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी विविध पर्याय दिसून येतात. कपडे आणि दागिने या आता अगदीच नियमित गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच दिवाळीला काहीतरी खास गिफ्ट हवं असतं. लहान मुलांचं मनही आता फक्त चॉकलेट्सने भरत नाही. आताची पिढी स्मार्ट असल्यामुळे त्यांना स्मार्ट गिफ्ट्सची अपेक्षा असते.

बर्‍याचदा नातेवाईकांना दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी आजकाल बाजारामध्ये अनेक वेगवेगळे पर्याय दिसून येतात. त्यामध्ये कुकवेअर, सेरामिक बाऊल्स, वॉचेस, स्मार्टवॉच, गिफ्ट व्हाऊचर्स, मुली अथवा महिला असल्यास, विविध ब्रँड्सचे कॉस्मेटिक्स, फायबर, स्टील्सच्या वस्तू, क्रॉकरी, टोस्टर, गृहसजावटीसाठी लागणार्‍या कलात्मक वस्तू, ब्लेंडर, फूड प्रोसेसर अशा गृहपयोगी वस्तूंचा गिफ्ट्स म्हणून समावेश होऊ शकतो.

कॉर्पोरेट, खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्येही भेट देण्यासाठी आता मिठाई आणि खाण्याच्या गोष्टींपेक्षा गृहपयोगी वस्तूंकडे कल जास्त वाढला आहे. तसंच आता स्मार्ट जग असल्यामुळे गॅझेट्सचाही जास्त प्रमाणात वापर होत असतो. ज्याचा फायदा कार्यालय आणि घर दोन्ही ठिकाणी होतो. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना जास्त जीबी असणारे पेन ड्राईव्ह, ब्ल्यूटूथ स्पीकर लँप, ब्ल्यूटूथ स्पीकर अशा तर्‍हेचे गिफ्ट्स जास्त प्रमाणात दिले जातात. त्याशिवाय अशा कार्यालयातील कर्मचार्‍यांना ड्रायफ्रूट्सदेखील गिफ्ट्स म्हणून दिले जातात.

यासाठी गिफ्ट शॉप्समध्ये अगदी ३५ रूपयांपासून ते ३० ते ३५ हजारांपर्यंत वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. शिवाय दिवाळीच्या निमित्ताने अशा गिफ्ट्सवर बरीच सूटही दुकानांमधून देण्यात येते. त्यामुळे दिवाळीपूर्वी साधारण एक आठवडा दुकानांमध्ये गिफ्ट्स घेण्याची लगबगही बघायला मिळते.

दिवाळीमध्ये गिफ्ट घेण्यासाठी आमच्याकडे प्रचंड गर्दी असते. दुकानात पाऊल ठेवायलाही जागा नसते. शिवाय अशा वेळी आम्ही वेगवेगळी कूपन्स आणि गिफ्ट्सवर सूटही देतो. त्यामुळे ग्राहक वाढतात. गेल्या चार – पाच वर्षांपासून गिफ्टिंग कल्चर खूपच प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दिवाळीत खूप चांगला फायदाही होतो.
– संदीप गाला, लक्ष्मी स्टोअर्स, गिरगाव

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here