घरमुंबईभुजबळांच्या भेटीमागे निवडणूक शिष्टाई !

भुजबळांच्या भेटीमागे निवडणूक शिष्टाई !

Subscribe

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी नुकतेच जामिनावर सुटका झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी काल भेट घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भुजबळ यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करून त्यांच्यावरील कारवाईला आपला पक्ष कारणीभूत नाही, असे सांगण्याचा प्रयत्न या भेटीत महाजन यांनी केल्याचे सांगितले जाते. आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात भुजबळांनी भूमिका घेऊ नये, असा प्रयत्न या भेटीतून सुरू केल्याचे सांगितले जाते. भुजबळ भेटीची ही निवडणूक शिष्टाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गिरीष महाजन यांनी सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत गिरीष महाजन यांनी एकाचवेळी दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत पालघरचा वचपा काढण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मदत करण्याचे जाहीर केले होते. मात्र या भाजपच्या मदतीनंतरही शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा विजय झाला. भुजबळांनी केलेल्या अंतर्गत मदतीमुळे विजय झाल्याचे स्वत: दराडे यांनी जाहीर केले. दराडे यांच्या पराभवासाठी नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीष महाजन मैदानात उतरले होते. तरीही दराडेच विजयी झाल्याने महाजन यांचा तो राजकीय पराभव मानला जातो. भुजबळांची मदत दराडेंना झाली असल्यास आगामी निवडणुकीतही भुजबळ आपल्या पक्षासाठी महाग ठरू शकतात, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना भुजबळांच्या भेटीसाठी पाठवल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

आगामी काळात भुजबळांचा फटका आपल्या पक्षाला बसू नये, यासाठी महाजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना कारवाईबाबत आश्वस्त केल्याचे सांगण्यात येते. आगामी काळात कारवाईसाठी आपला पक्ष पाठपुरावा करणार नाही, असेही महाजन यांनी भुजबळांना सांगितल्याचे बोलले जाते.

दरम्यान, भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. शनिवारी शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. तसेच लालूप्रसाद यादवांनीही भुजबळांशी फोनवरुन बातचीत केली होती.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -