जीव नकोसा झाला पण पोलिसांनी वाचवले

त्या महिलेचा आत्महत्येचा दुसरा प्रयत्न

Mumbai
girl attempt to suicide on sixth flour at thane
ठाण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेचे प्राण वाचविण्यात पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. एका पोलीस अधिकार्‍याने जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचविला आहे. कल्याणातील आंबिवली परिसरात राहणारी ती महिला आहे. सासू सासरे पतीला भेटू देत नाही या कारणावरून तिने काही दिवसांपूर्वीच ठाणे अधीक्षक कार्यालयासमोर धारदार काचेच्या वस्तूने स्वत:वर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी तिला अडवून आत्महत्येपासून परावृत्त केले हेाते. तिचा आत्महत्येचा हा दुसरा प्रयत्न होता.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील भास्कर अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर एक तरुणी उभी असून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे दृश्य लोकांनी पाहिले. त्यावेळी लोकांनी तिला आत्महत्या न करण्याची विनंती केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तिने उडी घेऊ नये यासाठी तिला बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी एपीआय विश्वास जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवला. तिने स्वत:च्या शरीरावर चाकूने जखमादेखील केल्या होत्या. पोलिसांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रिती केणे असे या महिलेचे नाव असून ती विवाहित आहे.

कल्याणजवळील आंबिवली येथे ती राहते. गेल्या बुधवारीच तिने ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धारदार काचेच्या वस्तूने स्वत:वर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मला जगायचे नाही. माझे सासू सासरे पतीला भेटू देत नाहीत, असे बोलून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त करीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिने पती व सासू सासर्‍यांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर कारवाई व्हावी, अशी तिची मागणी हेाती. मात्र, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तिने दुसर्‍यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.