‘एसटी’मध्ये काम करणारा नवरा हवा; इंजिनिअर तरुणीची मागणी

मुलीला लग्नासाठी हवाय एसटीमध्ये काम करणारा नवरा...

Mumbai
girls wants st employee for marriage
सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची मागणी

लग्न म्हटलं की आजकाल मुलींच्या मुलांकडून बऱ्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येक मुलीला सुस्थापित नवरा मुलगा हवा असतो. मात्र एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलीने चक्क एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने ही मागणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एसटी महामंडळाच्या वाहकांनी भररस्त्यात काही टवाळखोर मुलांकडून दोन मुलींची छेड काढली जात असताना पाहिल्यावर पुढाकार घेऊन त्यांना संरक्षण दिले. त्या टोळक्याच्या तावडीतून त्यांची सुटका केली. ही गोष्ट या दोन मुलींमधील एकीने लक्षात ठेवली. सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या या मुलीने एस. टी. महामंडळाशी नाते अतूट ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर लग्नासाठी आपला भावी नवरा ‘एसटी कर्मचारी’च हवा, अशी पोस्ट शेअर केली आहे.

राखी (नाव बदललेले) सध्या खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असून वेळात वेळ काढून मॉडेलिंगसुद्धा करते. राखी हे सर्व करताना तिला अद्यापही एसटीची ओढ कमी झालेली नाही. यामागचे कारणही अगदी हृदयस्पर्शी आहे. राखी रत्नागिरी येथील कॉलेजला जाण्यासाठी नेहमीच एसटी बसने प्रवास करायची. एकदा संध्याकाळी राखी बगीच्या समोरील रस्त्याने जात असताना चार ते पाच गुंडांनी राखी आणि तिच्या मैत्रिणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघींंनी गुंडांपासून बचावासाठी आरडाओरडा केला.

परंतु रहदारी कमी असल्यामुळे दोघींना कोणाचीही मदत मिळाली नाही. त्याचवेळी रत्नागिरी डेपोची बस रस्त्याने जात असताना एसटी चालकाने ते दृश्य पाहिले आणि बस थांबवली. एसटी चालक त्या गुंडांना मारायला पुढे सरसावले. बसमधील प्रवासीदेखील त्यांच्या मदतीला आले. त्यामुळे गुंडांनी पळ काढला. त्या चालकाचे नाव वसंत चौधरी आहे. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. ते त्यांच्या मुलाकडे राहतात.

राखीच्या वडिलांनीही एसटी महामंडळात सेवा दिली आहे. राखीसुद्धा एसटी महामंडळाची डीटीओ अधिकारीपदाची परीक्षा देत आहे. राखी आधीपासूनच दिलखुलास असल्याने एसटी कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधते. सध्या २४ वर्षीय राखीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. राखीने लग्न करेन तर फक्त एसटी कर्मचार्‍याशीच, असा निर्धार केला आहे.

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

राखी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणते की, मला लग्नासाठी माझ्यासारखा मनमोकळा मुलगा हवा आहे. माझे वय २४ वर्षे आहे. समवयस्क, निर्व्यसनी, अविवाहित, सदाचारी, हसून जीवन जगणारा, सावळा/गोरा, उंच असा मुलगा मला अपेक्षित आहे.