दंडात्मक कारवाई करताना मास्कही द्या; नगरसेविका सोनम जामसूतकर यांची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत कोविडच्या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक केल्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई करताना दंडात्मक कारवाई केलेल्या प्रत्येक व्यक्तीला महापालिकेच्यावतीने मास्क भेट देण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत ही मागणी केली आहे. तसेच पुन्हा त्याच व्यक्तीला दंडात्मक कारवाई केल्यास त्यांच्याकडून दुप्पट दंड आकारण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने मास्क वापरणे, हात धणे तसेच सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले जात आहे. या अंतर्गत एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आपण मास्क न लावणाऱ्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. जी व्यक्ती मास्क लावणार नाही त्याविरोधात कारवाई करून प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

मास्क न लावल्याप्रकरणी आपण जी कारवाई हाती घेतली ती स्वागतार्ह आहे. परंतु ही कारवाई करून २०० रुपयांचा दंड आकारल्यानंतर संबंधित व्यक्तीला महापालकेच्यावतीने एक मास्क मोफत दिले जावे. जेणेकरून महापालिकेचा हेतू साध्य होईल. मास्क दिल्यामुळे सदर व्यक्ती ते मास्क लावेल आणि जर पुन्हा ती व्यक्ती मास्क न लावलेली आढळून आल्यास त्या व्यक्तीकडून दुप्पट दंड आकारला जावा आणि त्यासोबतही एक मास्क सदर व्यक्तीला दिले जावे,अशी मागणी नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी केली आहे.

महापालिकेच्यावतीने या राबवण्यात येणाऱ्या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये एक शिस्तही लागत आहे. शिवाय यातून महापालिकेच्या तिजोरीत महसूलही जमा होत आहे. या मोहिमेचा परिणाम आता दिसून येत असून दंडाच्या भीतीने नागरिक आपली काळजी घेताना दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नगरसेविका सोनम जामसुतकर