पित्ताशयातील खडे फुटून संसर्ग झालेल्या रुग्णाला जीवदान

पित्ताशयातील खडे फुटून शरीरातील अन्य अवयवांपर्यंत संसर्ग पसरलेल्या मुंबईतील एका ५६ वर्षीय व्यक्तीवर जटील शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

pittashay

पित्ताशयातील खडे फुटून शरीरातील अन्य अवयवांपर्यंत संसर्ग पसरलेल्या मुंबईतील एका ५६ वर्षीय व्यक्तीवर जटील शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. वोक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट जीआय अँड एचपीबी सर्जन डॉ इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. १५ दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे.

भाईंदर मध्ये राहणारे प्रकाश आचार्य हे पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. खाल्ल्यानंतर अपचन (अँसिडिटी) होत असल्याने त्यांना अस्वस्थपणा वाटत होता. वारंवार उलट्या होत होत्या. वेदना इतकी तीव्र होती की त्यांना इंजेक्शन्सची आवश्यकता होती. आचार्य यांना जेवताही येत नव्हते. मधुमेह आणि उच्चरक्तदाब हा त्रास त्यांना नव्हता. परंतु, पोटातील वेदना असहय होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्यांना नर्सिंग होम मध्ये दाखल केले. रूग्णांची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी अहवालात त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. हे पित्ताशयाचे खडे फुटल्याने गुंतागुंत निर्माण झाली. मूत्रपिंड, फुफ्फुस आणि हदयाला यामुळे संसर्ग झाला होता. अशा स्थितीत नर्सिंग होममध्ये पित्त मूत्राशय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. पण अनेस्थेसियानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला. अशावेळी तातडीने कार्डिओपल्मोनरी रीसिसिटेशन (सीपीआर) देण्यात आले. सीपीआरच्या दोन प्रयत्नांनंतर त्याने प्राण वाचले. परंतु पुढील उपचारासाठी रूग्णाला वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आले.

रूग्णाला उपचारासाठी आणले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. आपत्कालीन विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हदयविकाराचा झटका आल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णाला औषधांचे तीव्र डोस देणे गरजेचे होते. रुग्णाची सीटीस्कॅन चाचणी केली असता त्याचा पित्त मूत्राशय पोटात फुटल्याचे दिसून आले. ज्यामुळे या व्यक्तीच्या मूत्रपिंड, फुफ्फुस आणि हदयाला संसर्ग झाला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय होता. साधारणत: चार तास शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर ७२ तासात त्याचे हृदय आणि बीपी स्थिर झाले आणि मूत्रपिंड सुधारले. शस्त्रक्रियेनंतर एक आठवड्याने त्यांना संपूर्ण आहार देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर या व्यक्तीला दोन आठवड्यानंतर घरी सोडण्यात आले. आता या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती डॉ. इम्रान शेख यांनी दिली.

माझ्या ओटीपोटात असह्य वेदना जाणवत होत्या. या वेदनेमुळे मला नीट चालताही येत नव्हते. पित्ताशयाचे खडे फुटल्याचे कळल्याने मी खूप घाबरून गेलो होतो. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मला नव्याने आयुष्य मिळाले.
– प्रकाश आचार्य, रुग्ण