घरमुंबईमावशीने केलं यकृतदान; चिमुरडीला मिळालं जीवदान!

मावशीने केलं यकृतदान; चिमुरडीला मिळालं जीवदान!

Subscribe

पश्चिम भारतातील सर्वात कमी म्हणजेच ४.७ किलोग्रॅम वजनाच्या एका बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील सर्वात कमी म्हणजेच ४.७ किलोग्रॅम वजनाच्या एका बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्मजात बायलिअरी अट्रेशिया या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या या मुलीवर प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. आपल्या मुलीला नेमका कोणता आजार आहे? हे सूरतमध्ये राहणाऱ्या या मुलीच्या आई-वडिलानांही कळत नव्हतं. स्थानिक डॉक्टरांकडे चौकशी केल्यानंतर या मुलीचं वजन सतत कमी होत असून तिला कावीळ झाल्याचं सांगितलं. पण, या आजाराला काय म्हणतात? हे त्यांना माहित नव्हतं.

सर्वात कमी वजनाच्या चिमुरडीवर यकृत प्रत्यारोपण!

त्यानुसार, आई-वडिलांनी मुलीला मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या मुलीवर कशा पद्धतीने उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाईल याविषयी चर्चा केली. या मुलीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी एका दात्याची गरज होती. शिवाय, या मुलीच्या यकृताच्या आकाराएवढ्या यकृताचीही गरज होती. तिचा रक्तगट सारखा असणाऱ्या व्यक्तीचंच यकृत तिला मिळणं गरजेचं होतं. याबाबत आईला विचारणा केली असता आईच्या यकृताचा आकार आणि रक्तवाहिन्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे, इप्साच्या मावशीने तिला यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. मावशीच्या यकृताचा आकार इप्साच्या यकृतासाठी योग्य होता. शिवाय, रक्तगट ही सारखा असल्याने यकृत प्रत्यारोपणासाठी त्या योग्य ठरल्या.

- Advertisement -

त्यानुसार, २१ मे २०१९ या दिवशी या चिमुरडीवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. रवि मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमाळ यांच्या नेतृत्वाखालील स्पेशलाइझ्ड पेडिअॅट्रिक यकृत प्रत्यारोपण पथकाने ८.५ महिन्याच्या मुलीवर जटील स्वरूपाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या बाळाचे वजन शस्त्रक्रियेच्या वेळी केवळ ४.७ किलोग्रॅम होते. त्यामुळे ही पश्चिम भारतातील आत्तापर्यंतची सर्वांत कमी वजनाच्या रुग्णावरील यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे.

इप्साला बायलिअरी अट्रेशियाचा विकार होता. ही अवस्था क्वचितच म्हणजे दर २ हजार मुलांमागे एका मुलात आढळते. पण, इप्साच्या केसमध्ये तिचे वय ९० दिवसांहून अधिक झाल्यानंतर या अवस्थेचे निदान झाले. त्यामुळे, वेळेत यकृताचे प्रत्यारोपण करणे हा बाळाला वाचवण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव पर्याय होता.  – डॉ. अनुराग श्रीमाळ; पेडिअॅट्रिक यकृत प्रत्यारोपण

- Advertisement -

इप्सा मोठी होत होती तसा तिचा आजारही वाढत होता. तिला कावीळ होती, अस्काइट्स (पोटात पाणी) झाले होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिची वाढ थांबली होती. सतत हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत असल्याने तिला अनेक प्रकारचे प्रादुर्भाव झाले होते.  – डॉ. विभोर बोरकर; पेडिअॅट्रिक हेपॅटोलॉजिस्ट

अशी केली शस्त्रक्रिया

५ किलोंहून कमी वजनाच्या बाळांचे यकृत प्रत्यारोपण ही सर्वांत आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक आहे. छोट्या बाळांच्या रक्तवाहिन्या खूप छोट्या असतात आणि प्रत्यारोपित यकृताला त्या जोडण्यासाठी खास विशिष्ट शस्त्रक्रिया करावी लागते. ही जटील शस्त्रक्रिया जवळपास शून्य रक्तस्रावासह पार पडली. तिला संपूर्ण शस्त्रक्रिये दरम्यान, केवळ ३० मिली रक्त द्यावे लागले. त्या छोट्या बाळाची शस्त्रक्रियोत्तर काळजी घेणे शस्त्रक्रियेइतकेच आव्हानात्मक होते. कारण, अशा परिस्थिती काटेकोर असेप्सिस आणि प्रत्येक तपशिलाकडे लक्ष देणे अत्यावश्यक असते.


हेही वाचा – दुर्मिळ हृदयदोषावर हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, तरुणीचे वाचले प्राण!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -