घरमुंबईमुंबईत रंगला गोवा फेस्टिव्हल

मुंबईत रंगला गोवा फेस्टिव्हल

Subscribe

मुंबईसह देशातील पर्यटकांना भुरळ असणार्‍या गोव्याच्या मेजवानी आणि कलाकसुरीच्या मेजवानीचा सुरेख संगम मुंबईकरांना नुकताच अनुभवता आला. निमित्त होते नवव्या गोवा फेस्टिव्हलचे. खार येथे नुकत्याच पार पडलेल्या गोवा फेस्टिव्हलला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, या फेस्टिवलनिमित्त ज्येष्ठ संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांना सिनेमा, नाट्यभूमी,दूरदर्शन, जाहिराती, जिंगल्स यांसारख्या विविध माध्यमांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेता महेश कोठारे यांच्या हस्ते मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.

दरवर्षाीप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस करण्यात आले होते. काल या फेस्टिवलचा अखेरचा दिवस होता. या कार्यक्रमाला अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणार्‍या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दरवर्षी गोवा फेस्टीव्हलचे आयोजन ‘आम्ही गोयंकार’ या संस्थेतर्फे करण्यात येते.

- Advertisement -

याप्रसंगी संगीतकार कौशल इनामदार यांनी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची मुलाखत घेतली. यावेळी इनामदार असे म्हणाले, अशोक पत्की यांची बहुतांश गीते ही लोकप्रिय आहेत. त्यांची सर्वच गीते त्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या रचनांसाठी ओळखली जातात, त्यांचे संगीत क्षेत्राला मोलाचे योगदान लाभले आहे, तसेच इतक्या मोठ्या व्यक्तीरेखेची मुलाखत घेण्याची संधी प्राप्त झाल्याने कौशल इनामदार यांनी आयोजकांप्रति आभार व्यक्त केले.या मुलाखतीदरम्यान अशोक पत्की यांनी केलेल्या दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या जाहिरातीपासून अविस्मरणीय राष्ट्रसशक्तीकरण गीत ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ पर्यंतचा संगीत क्षेत्रातील वाटचालीच्या प्रवासाचा मागोवा कौशल इनामदार यांनी घेतला. यावेळी अशोक पत्की यांच्या संगीत साधनेतील विविध पैलुंंवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी अशोक पत्की यांनी त्यांच्या काही सुप्रसिद्ध गीतांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

दोन दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये नानाविध स्टॉल्सचे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या फेस्टिव्हलमध्ये रसिकांना विविध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र, मनोरंजन,संगीत,खमंग गोवन खाद्यपदार्थ, गोवन उत्पादनांच्या प्रदर्शनासह गोवन वस्तू खरेदी करण्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या गोवा फेस्टिव्हलला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -