घरमुंबईमहापौरांना भेटायला जात आहात?

महापौरांना भेटायला जात आहात?

Subscribe

मोबाईल बाहेर ठेवा मगच भेट घ्या!

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात पिरगळला. त्याचे कोणीतरी मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल केले. त्यामुळे महापौरांवर टिकेचा मारा होत असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्याने धास्तावलेले महापौर आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत. आपल्याला भेटायला येणार्‍यांकडे मोबाईल नसेल याची काळजी महापौरांनी घेतली आहे. भेटायला येणार्‍यांना मोबाईल बाहेर ठेवूनच दालनात प्रवेश दिला जावा, अशा सूचना आपल्या कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे दालनाबाहेर मोबाईल ठेवूनच महापौरांना भेटायला जावे लागणार आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सध्या वेगवेगळ्या कारणांनी वादात अडकत आहेत. मुंबईत पाणी तुंबूनही पाणी तुंबलेच नसल्याचा दावा महापौरांनी केला होता. त्यामुळे सोशल मिडियावर महापौर चांगलेच ट्रोल झाले होते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौरांना चष्मा भेट पाठवला होता. त्यानंतर सांताक्रुझ येथील गोळीबार नगर येथे पाणी जमा होवून वीजेच्या झटक्यामुळे आई आणि मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा महापौर, स्थानिक नगरसेवकासह मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यास गेले.

- Advertisement -

पण तिथे स्थानिकांनी त्यांना तीव्र विरोध केला. या दोघांच्या मृत्यूनंतर दिवसभरात न फिरकल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता. यावेळी तेथील महिलांशी त्यांची ‘तू तू मै मै’ झाली. तेव्हा तेथे हुज्जत घालणार्‍या एका महिलेचा हात महापौरांनी पिरगळला. त्याचे मोबाईलवर महापौरांच्या नकळत चित्रीकरण करण्यात आले. विरोधकांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करत महापौरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मनसेचे त्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री निती’ हे पुस्तक भेट देवून महिलांशी कसे वर्तन करावे,असा संदेश दिला.

यासर्व प्रकारानंतर महापौरांनी मोबाईल फोनची धास्ती घेतली आहे. आपल्याला भेटायला आलेला कुणी,अशाचप्रकारे गुप्तपणे मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग करेल आणि आपल्याला अडचणीत आणेल, या भीतीने महापौरांनी भेटायला येणार्‍यांना दालनाबाहेर मोबाईल फोन ठेवूनच आतमध्ये प्रवेश दिला जावा,अशी सूचना कार्यालयीन कर्मचार्‍यांना केली आहे. महापौरांनी, बुधवारी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापौरांच्या दालनाबाहेर आता मोबाईल फोन ठेवण्यासाठी ट्रे ठेवला जाणार आहे. या ट्रेमध्ये मोबाईल ठेवूनच महापौरांच्या भेटीसाठी लोकांना जावे लागणार आहे.
कोट

- Advertisement -

मला भेटायला येणारे कुणीही काहीही रेकॉर्डिंग करत असतात. त्यामुळे मी त्यांचे मोबाईल दालनाबाहेर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु पत्रकार आणि अधिकार्‍यांसाठी ते निर्देश नाहीत.
-प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -