घरमुंबईअखेर अंधेरीतील गोखले पुलाची होणार पुनर्बांधणी

अखेर अंधेरीतील गोखले पुलाची होणार पुनर्बांधणी

Subscribe

बांधकामासाठी आंध्रप्रदेशमधील कंपनीची निवड ,शहरापाठोपाठ आता पश्चिम उपनगरातही पूलकोंडी

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पादचारी पूल दुघर्टनेनंतर अखेर या पुलाचे बांधकाम पूर्णपणे पाडून नव्याने याचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूकही झाली असून यासाठी १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे काम आंध्र प्रदेशातील कंपनी करणार आहे. आता जुहूमधील पुलापाठोपाठ गोखले पुलाचे काम हाती घेतले जाणार असल्याने जसे मुंबई शहरात पूल दुरुस्तीच्या कामांमुळे पूलकोंडी सुरू आहे, तसे पश्चिम उपनगरवासियांना पूलकोंडीचा सामना करावा लागणार आहे.

अंधेरी येथील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले हा रेल्वेवरील एकमेव उड्डाणपूल आहे. तीन वर्षांपूर्वी या पुलावरील पादचारी पुलाचा भाग कोसळून अनेक जण जखमी झाले होते, तर काहींचे बळी गेले होते. त्यानंतर या पुलाची संरचनात्मक तपासणी आयआयटीसह तांत्रिक सल्लागारांच्या मदतीने करण्यात आली. या पुलाच्या पाहणीनंतर रेल्वेवरील सर्व पुलांचे संरचनात्मक सर्वेक्षण आयआयटीच्या मदतीने करण्यात आले होते. परंतु या संरचनात्मक पाहणीमध्ये गोखले उड्डाणपूल हा अत्यंत धोकादायक असल्याने समोर आले. त्यामुळे तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्यावतीने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये दोन कंपन्यांनी सहभाग दर्शवला. त्यात आंध्र प्रदेशातील एमएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या अंदाजित दराच्या तुलनेत १८ टक्के अधिक दराने अर्थात सर्व करांसह तब्बल १३८ कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात आले आहे.

- Advertisement -

अंधेरीच्या या गोखले पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वे पुलांसह पादचारी पुलांची तांत्रिक सल्लागारांकडून तपासणी करून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार लोअर परळ येथील पूल तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, तर अन्य रेल्वे मार्गावरील पुलांची मोठ्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली. याशिवाय त्या पुलांवरुन अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. या तांत्रिक सल्लागारांच्या पाहणीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाचा भाग कोसळून अनेक जण मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा गोखले पूल व हिमालय पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व पुलांची फेर तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती व डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. ज्या पुलाच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वेवरील पुलांचे स्ट्रक्चर ऑडीट करून डागडुजी हाती घेण्यात आली, त्याच पुलाचे बांधकाम तीन वर्षांंनंतर महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे शहरांमधील पूल कोंडी सुरू झाल्यानंतर आता जुहूबरोबर अंधेरी पुलाचेही बांधकाम हाती घेतले जाणार असल्यानेळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांना पूलकोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

पुलाची एकूण लांबी : २६५ मीटर
पुलाची रुंदी : दोन्ही बाजुच्या पदपथासह २६.८ मीटर
स्पॅनची संख्या : ११
बांधकामाचा प्रकार : आर.सी.सी स्ट्रक्चर आणि स्टिल गर्डर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -