घरमुंबईदेवेंद्र फडणवीसांचा ‘वर्षा’ला निरोप

देवेंद्र फडणवीसांचा ‘वर्षा’ला निरोप

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या निवासस्थान ‘वर्षा’वर लागून राहिले होते. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक मिम्स फिरताना आपल्याला दिसले. अखेर ‘वर्षा’ हा मुख्यमंत्र्यांचा बंगला फडणवीस यांनी सोडला आहे. बुधवारी त्यांनी हा बंगला सोडल्याची माहिती मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे आपल्या नव्या बंगल्यात राहण्यासाठी जाणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या ‘वर्षा’ आगमनाकडे लागले होते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगला कधी खाली करतात, याचीही चर्चा होती. या बंगल्यावरुन सोशल मीडियावर बरेच तर्कवितर्क सुरू होते. अनेकांनी या बंगल्यावरुन विनोदाची एक मालिका सुरू केली होती. अखेर फडणवीसांनी हा बंगला सोडल्याची माहिती मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारतर्फे एक शासन निर्णय(जीआर) जाहीर करण्यात आला होता. या जीआरनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा हा बंगला देण्यात आला. मुळात महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे आतापर्यंत वर्षा बंगल्यावर राहिले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्ताकेंद्र म्हणून वर्षा बंगल्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे याही वेळी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ बंगल्याचा ताबा घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी जाणार की ‘मातोश्री’ या त्यांच्याच निवासस्थानी राहणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी जे जे करावे लागणार ते मी करणार असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यामुळे ते वर्षा या निवासस्थानी कधी जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. अखेर आता देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर ठाकरे तिथे कधी जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील ‘सागर’ हा शासकीय बंगला देण्यात आला. त्यामुळे आता फडणवीस यांना वर्षावरून सागरवर जावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी अद्याप सागर बंगल्याचा ताबा घेतलेला नाही. काही दिवसानंतर ते या बंगल्यांचा ताबा घेतील, असे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सध्या वर्षा बंगल्याचा ताबा घेतलेला नसून ते लवकरच याठिकाणी भेट देतील, अशी माहिती पुढे आली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे कामकाज वर्षांवरुन
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या आगमनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा बंगल्यावर नियमानुसार मुख्यमंत्र्यांचे एक कार्यालय असणार असून सर्व कामकाज ते याठिकाणीहून पाहणार असल्याचे कळते. मात्र राहण्यासाठी उद्धव ठाकरे हे मातोश्रीलाच प्राधान्य देतील, असे बोलले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -