वसईत गुडविनच्या गुंतवणूकदारांची एकजूट

Mumbai
गुडविन ज्वेलर्सने फसवणुक केलेल्या गुंतवणुकदारांनी वसईत एक सभा घेतली होती. त्याला खासदार राजेंद्र गावीत यांच्यासह पोलीस अधिकारी हजर होते.

गुडविन ज्वेलर्सप्रकरणी फसवणूक झालेल्या वसईतील शेकडो ग्राहकांनी एकत्र येत गुरूवारी रात्री वसई येथील विश्वकर्मा हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत, माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळी, आर्थिक गुन्हे शाखेेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, सहा.पोलीस निरीक्षक धायगुडे, भाजपाचे शहर अध्यक्ष उत्तम कुमार, सुधांशू चौबे उपस्थित होते.

गुडविन ज्वेलर्सच्या फसवणूक प्रकरणी पोलीस मालकांचा शोध घेत आहेत. मात्र आपले गुडविनच्या स्कीममध्ये गूंतवलेले पैसे बुडाले या चिंतेने ग्राहकांची सद्या झोप उडाली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी गुरूवारी खासदार गावितांसोबत बैठक घेतली होती. पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडविन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. गुडविनच्या दुकानांना टाळे लागले आहे. त्यामुळे ज्यांनी त्याच्याकडे पैसा गुंतवला होता. त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. वसईतील या फसवणूक झालेले ग्राहक विचारविनिमय करण्यासाठी वसईत एकत्र आले होते.

याबैठकीस सकारात्मक प्रतिसाद देत 900 हून अधिक लोक उपस्थित होते.यावेळी खासदार राजेंद्र गावीत यांनी,सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे वसई विरार व मिरा भाईंदर महानगरक्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली.

दरम्यान, वसई, माणिकपूर आणि मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकप्रकरणी 800 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक गुंतवणूक तक्रारी करीत आहेत. सध्या फसवणुक झालेल्यांची संख्या एक हजारांच्या घरात पोचली असून तब्बल वीस कोटी रुपयांच्या घरात फसवणूक झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here