मासे खवय्यांसाठी खुषखबर

ओएनजीसीचे सर्वेक्षण बंद झाल्याने मासेमारी सुरू

Mumbai
vasai

मच्छिमारांच्या आंदोलनानंतर ओएनजीसीने सर्वेक्षण बंद केले असून मासेमारीसाठी बोटी समुद्रात गेल्यामुळे मासे खवय्ये खूष झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात या भागातील माशांची आवक वाढण्याची शक्यता आहे.उत्तन ते डहाणू दरम्यानच्या खोल समुद्रात तेल आणि वायुंचा शोध घेण्यासाठी ओएनजीसीने स्थानिक मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात बोटी नेण्यास मनाई केली होती. एक जानेवारीपासून ओएनजीसीने सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. दोन महिन्यांहून अधिक काळ हे सर्वेक्षण सुरू राहणार असल्यामुळे मच्छिमारांमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक मच्छिमारांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून मासेमारीसाठी बोटी तयार केल्या होत्या. त्यांच्यावर या बंदीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. खवय्येही मासे मिळणार नसल्यामुळे निराश झाले होते. जानेवारीचा संपूर्ण महिना बर्फातील मासे खवय्यांना खावे लागले होते. मात्र आता ओएनजीसीचे सर्वेक्षण बंद झाले असून मासेमारीच्या बोटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ताजे मासे येत्या काळात या भागात उपलब्ध होणार आहेत.

मासेमारीला बंदी घातल्यामुळे मच्छिमारांनी 14 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे 1 फेब्रुवारीला एकाच वेळी समुद्रात आणि किनार्‍यावर अशी दोन्ही ठिकाणी मच्छिमारांनी आंदोलन करून ओएनजीसीच्या बोटींना काळे झेंडे दाखवले होते. या आंदोलनाची दखल घेवून उपायुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ओएनजीसीचे अधिकारी एस.के.शर्मा, व्यवस्थापक एस.सी.मीना, सर्वेक्षण अधिकारी बी.के.महापात्रा, उपायुक्त यु.ए.चौगुले, ठाणे मच्छिमार संघ, कृती समिती यांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.

या बैठकित ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मत्स्य आयुक्त कार्यालयात एक बैठक घेण्यात येणार आहे. त्यात सर्वेक्षण करण्यासाठी समुद्र मत्स्य संशोधन केंद्राची परवानगी घेण्यात आली होती का, सर्वेक्षणासाठी करण्यात येणार्‍या स्फोटामुळे जैव विविधता, मत्स्यबिजे नष्ट होतील का? यावर विचार विनीमय करण्यात येणार आहे. तूर्तास मासेमारी सुरू झाल्याने मच्छिमारांमध्ये आनंद पसरला आहे.