घरमुंबईराजावाडी रुग्णालयात एका गोळीचा गोंधळ

राजावाडी रुग्णालयात एका गोळीचा गोंधळ

Subscribe

गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील मुलांना औषध दिल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. याच संशयातून मुलांच्या पालकांनी मुलांना घेऊन शुक्रवारी दुपारी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला.

आपली मुलं लहान आहेत त्यामुळे त्यांना थोडं खरचटलं तरी पालक घाबरुन जातात. पण, कधीकधी अशा घाबरण्याचे साईड इफेक्टस पाहायला मिळतात. गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील मुलांना औषध देण्यात येते. या शाळेतील एका विद्यार्थ्याची तब्येत बिघडली आणि त्यानंतर सुरु झाला एकच गोंधळ. शाळेत दिलेल्या औषधामुळेच विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याच संशयातून मुलांच्या पालकांनी मुलांना घेऊन शुक्रवारी दुपारी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली.

चांदणीच्या मृत्यूनंतर गोंधळ

महापालिका शाळेतील चांदणी शेख या विद्यार्थीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी पालकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. आपल्या मुलांनाही सकाळी कोणती तरी गोळी दिली आहे. त्याच गोळीमुळे मुलांना पोटदुखीचा, मळमळीचा आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पालक मुलांना घेऊन राजावाडी रुग्णालयात दाखल झाले. अशा एकूण ३५० मुलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी आता फक्त १७ मुलं राजावाडी रुग्णालयात दाखल आहेत. ही मुलं खूप उशिरा दाखल झाली म्हणून त्यांना रुग्णालयात ठेऊन घेण्यात आलं आहे. त्यांना ही डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे. याचप्रमाणे ३६ मुलांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी २२ मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या सर्व मुलांची बालरोग तज्ज्ञांद्वारे तपासणी केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार..

६ ऑगस्ट म्हणजेच सोमवारी चांदणीला शाळेत लोह आणि फॉलीक अॅसिडयुक्त गोळी दिली गेली. दुसऱ्या दिवशी प्रकृती ठीक नसल्याने चांदणी शाळेत गेली नाही. या गोळ्या केंद्र सरकारच्या एका राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवशी ती शाळेत हजर राहिली. पण गुरुवारी रात्री तिला रक्ताची उलटी झाली आणि शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तिला पालकांनी राजावाडी रूग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. चांदणीला यापूर्वी काही त्रास होता का? याची माहिती अजून नाही. तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यू नेमका का झाला? याची माहिती मिळू शकेल. तसंच, काही मुलांनी मळमळ, अस्वस्थता आणि चक्कर येत असल्याची तक्रार केली. पण, त्यांच्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत.

यासंदर्भात आरोग्य समितीच्या अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी सांगितले की, “६ ऑगस्टला चांदणीने औषधं घेतलं होतं. या मुलांना दर आठवड्याला या गोळ्या दिल्या जातात. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता चांदणीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळल्यानंतर, शाळेतील मुलांनाही पालकांनी राजावाडी आणि शताब्दी रूग्णालयात दाखल केलं. पण, पालकांनी संशयातून त्यांच्या मुलांना रुग्णालयात दाखल केलं आहे. दाखल झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर आहे. फक्त गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.”

- Advertisement -

चांदणीचा विषबाधेतूनच मृत्यू ?

सोमवारी चांदणीला गोळी देण्यात आली होती. ती तेव्हापासून उलटी आणि छातीत दुखल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांकडे करत होती. सकाळीही तिने उलटी केली. तिला चार दिवसांपासून हा त्रास होत होता. तिला औषध खाल्यापासूनच त्रास झाला आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप चांदणीचे वडील साहील शेख यांनी केला आहे.

अशा दिल्या जातात गोळ्या

संजय नगर महापालिका उर्दू शाळेत सकाळच्या सत्रात ६०७ आणि दुपारच्या सत्रात ६३२ असे एकूण १२३९ विद्यार्थी शिकतात. यापैकी पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी आयर्न आणि फॉलिक अॅसिडची ४५ मिली ग्रॅम वजनाची प्रत्येकी एक गोळी देण्यात येते. तर, सहावी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० मिली ग्रॅमची गोळी देण्यात येते. शुक्रवारी झालेल्या चांदणीच्या मृत्यूनंतर चेंबूरच्या बैगणवाडी परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. पण, पालकांनी न घाबरता थोडा विचार करुन, सर्व गोष्टींची शहानिशा करुन निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलं ही घाबरणार नाही आणि त्यातून गोंधळाचं वातावरण निर्माण होणार नाही.

आरोग्यवर्धक गोळ्या काही काळासाठी बंद

शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्पुरती आयर्न फॉलीक अॅसिड ही गोळी न देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या खबरदारीतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तिन्ही पालिका प्रशासनाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -