ऐन दिवाळीत जनतेच्या ‘गैर’सोयीचा सप्ताह!

सरकारी कार्यालयांना सलग सहा दिवस कुलूप !

Mumbai
bmc office
मुंबई महापालिका कार्यालय

दिवाळीनिमित्त बुधवारपासून सलग तीन दिवस सुट्टी त्यापाठोपाठ दुसरा शनिवार व रविवार आल्याने सलग पाच दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. सलग पाच दिवस सुट्टी आल्याने सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहराबाहेर किंवा गावाकडे दिवाळीसाठी जाण्याचे नियोजन केले आहे. मंत्रालय, मुंबई महापालिकेत पाच दिवस सुट्टी असताना ठाणे व नवी मुंबई महापालिकेने मंगळवारीही सुट्टी जाहीर केल्याने येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना सलग सहा दिवस सुट्टी मिळाली आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात होणार असली तरी सरकारी कामे होणार नसल्याने हा आठवडा नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरणार आहे.

मंत्रालय व अन्य सरकारी कार्यालयांना बुधवारपासून तीन दिवस दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ठाणे व नवी मुंबई महापालिकेने नरक चतुर्दशीनिमित्त अधिकारी व कर्मचार्‍यांना सुट्टी दिली होती. पालिका कार्यालय बंद राहणार आहे याची कल्पना नागरिकांना नसल्याने विविध कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांची निराशा झाली. कार्यालये बंद असली तरी काही महत्त्वाच्या खात्यातील अधिकार्‍यांनी लावलेली हजेरी वगळता सर्व कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. ठाणे व नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका व नगरपालिकांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

दिवाळीनिमित्त सहा दिवस असलेल्या सुट्टीच्या काळात नागरी सुविधा केंद्र बंद असल्याने विविध कर नागरिकांना भरता येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालय आदी सरकारी कार्यालये सहा बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढील सहा दिवस कोणतेही सरकारी काम होणार नाही. ठाणे, नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी सुट्टी जाहीर केली असली तरी मंत्रालय व मुंबई महापालिकेतील कार्यालये सुरू होती. मात्र या कार्यालयांमध्येही दिवाळीनिमित्त शुकशुकाट पाहायला मिळाला.

मंगळवारी नरकचतुर्दर्शीपासून रविवारपर्यंत तब्बल सहा दिवस कार्यालये बंद राहणार असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहलीचे बेत आखले आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांकडून दिवाळी उत्साहात साजरी करण्याचे बेत आखले जात असताना कंत्राटी सफाई कामगार व वाहतूक कर्मचार्‍यांना सुट्ट्या नसल्याने त्यांची दिवाळी रस्त्यावरच होणार आहे.

दिवाळीनिमित्त सलग सहा दिवस सुट्ट्या असल्याने महापालिकेची कार्यालये व नागरी सुविधा केंद्रे बंद राहणार आहेत. सोमवारी कार्यालये उघडणार आहेत.
– प्रसाद ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, केडीएमसी

आर्थिक व्यवहार होणार ठप्प
दिवाळीनिमित्त सर्व सरकारी व खासगी बँका रविवारपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांचे विविध कर्जाचे हफ्ते, आर्थिक देवाणघेवाण पूर्णत: ठप्प होणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे एटीएम मशीनमध्ये पैसे भरलेले असले तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या खरेदीमुळे एटीएममध्येही खडखडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here