घरमुंबईउन्हात दिवसभर बसून गुंजन रंगवतेय पणत्या,कुटुंबाला मदत करण्यासाठी पंढरपूरहून आली ठाण्याला

उन्हात दिवसभर बसून गुंजन रंगवतेय पणत्या,कुटुंबाला मदत करण्यासाठी पंढरपूरहून आली ठाण्याला

Subscribe

दिवाळी सण म्हणजे खरेदी, विक्रीची पर्वणी असलेला सण. या सणाला ग्राहक मुक्तहस्ते खरेदी करतात. त्यातून चार पैसे गरजू व्यक्तींच्या हाती पडतात. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पंढरपूर येथून सुमारे शंभरच्या पुढे आदिवासी पारधी समाजातील लोक पणत्या, कंदील विक्री करण्यासाठी ठाण्यात आलेले आहेत. त्यात आपल्या आत्या, आजी, मोठ्या भावासोबत दहा वर्षांची गुंजन काळे नावाची ही चिमुकली आली आहे. पणत्या रंगवून, कंदील करण्यास मदत करून गुंजन आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभळत आहे.

दहा वर्षांची ही गुंजन, अलका विठ्ठल चव्हाण या आपल्या आजीसोबत दिवाळी सणाला ठाण्यात येते. येथे येऊन ती पणत्या विक्री करते. मागील तीन वर्षांपासून गुंजन या ठाण्यात येत आहे. गुंजन सध्या पाचवीत शिकत आहे. ती पंढरपूर येथील वाकरी गावात आपले आई, वडील ,मोठा भाऊ, बहिणीसोबत राहते. कौटुंबिक कारणामुळे तिची आई तिला सोडून गेलेली आहे. गुंजनचे संपूर्ण कुटुंब हे पंढरपूरला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मोठ्या भावाचे तसेच बहिणीचे लग्न झालेले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी गुंजन तीन वर्षांपासून ठाण्यात पणत्या विक्रीसाठी येत आहे.

- Advertisement -

उन्हामध्ये दिवसभर बसून ती १०० ते १५० मातीच्या पणत्या रंगवते. स्टेशन बाहेरील गोखले रोडवरील दुभाजकावर, रस्त्यावर ती बसलेली दिसते. कंदील आणि पणत्या विकून तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला ६०० ते ७०० रुपये मिळतात. तिने रंगिवलेल्या पणत्या २० ते ४० रु जोडीने विक्री होत आहे. परंतु त्यातही ग्राहक तिच्याशी घासघीस करतात. एखाद्या दिवशी सर्वांना पोटभर अन्न मिळेल इतकेही पैसे त्यांना मिळत नाही. त्यामुळे वडापाव, चायपावावर संपूर्ण दिवस काढावा लागतो. पूर्वी ठाण्यात रस्त्यावर जास्त कोणी पणत्या, कंदील विक्री करण्यास येत नव्हते. मात्र आता स्थानिक लोकांनी ही धंधा सुरु केल्यामुळे आमचा धंदा होत नाही, असे गुंजनच्या आजीने सांगितले.

दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला गुंजनसह तिचे संपूर्ण कुटुंब परत पंढरपूरला जाणार आहे. या दिवसांत दिवसभर उन्हात राबून गुंजन आणि तिच्या कुटुंबाला जेमतेम सात ते आठ हजार रुपये मिळतील. पण तिही त्यांच्यासाठी दिवाळी असेल. कारण तितकेही पैसे त्यांना त्यांच्या गावी मिळत नाहीत. अर्थात त्यासाठी गुंजन आणि तिच्या कुटुंबाची मेहनत खूप मोठी आहे.

- Advertisement -

अमित मार्कंडे । ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -