घरमुंबईडोंबिवलीत 'अशीही' नालेसफाई; कचरा पुन्हा नाल्यात

डोंबिवलीत ‘अशीही’ नालेसफाई; कचरा पुन्हा नाल्यात

Subscribe

पावसाळापूर्व नालेसफाईत नाल्यातून काढलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने तोच कचरा पावसात नाल्यात पुन्हा वाहून जात आहे.

कोपर नाल्याची सफाई करताना त्यातील कचरा हा नाल्याच्या शेजारी टाकण्यात आला होता. मात्र सोमवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे हा कचरा पुन्हा नाल्यात गेला आहे. त्यामुळे डोंबिवलीत नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचेच दिसून येते.

नालेसफाई नक्की झाली का?

कोट्यवधी रूपये खर्च करून महापालिकेने नालेसफाईचे कंत्राट दिले आहे. खासगी कंत्राटदाराकडून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र नाल्यातील हा कचरा नाल्याच्या शेजारीच टाकला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक पिशव्यांचाच समावेश आहे. सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने डोंबिवलीतील सर्वात मोठा समजला जाणारा कोपर नाल्यात हा कचरा पुन्हा वाहून गेला. त्यामुळे नालेसफाई करून उपयोग काय? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे नालेसफाईची कामे होऊन सुध्दा कोपर गावात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नालेसफाई नक्की झाली का? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

- Advertisement -

मनसेकडून नाल्याचे नामकरण

कोपर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या या नाल्याची साफसफाई केली नसल्याने मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. मनसेने नाल्याचे ‘महापौर नाला’ असे नामकरण करून सेनेला टोला हाणला होता. मात्र त्यानंतर या नाल्याची साफसफाई करण्यात आली. परंतू, नाल्यातील कचरा हा नाल्याशेजारीच टाकण्यात आला. त्यामुळे हा कचरा पुन्हा नाल्यात गेल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका हद्दीत एकूण ४२ मोठे नाले आहेत. मात्र नालेसफाई करताना हा कचरा नाल्याच्या शेजारीच टाकला जातोय. या कतऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरून पावसामुळे हा कचरा पुन्हा नाल्यात जाणार नाही, अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -