घरमुंबईबहुचर्चित हँकॉक पुलाचा खर्च २५ कोटींनी वाढला

बहुचर्चित हँकॉक पुलाचा खर्च २५ कोटींनी वाढला

Subscribe

मुंबईतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हँकॉक पुलाच्या कंत्राटाची किंमत वाढल्याची बाब समोर आली आहे.

दक्षिण मुंबईतील बहुचर्चित रखडलेल्या हँकॉक पुलाच्या कामाला प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली असली तरी याचे काम अत्यंत कासवगतीने सुरु आहे. या पुलाच्या बांधकामाला गती देण्याची मागणी नगरसेवकांसह स्थानिक रहिवाशांकडून होत असली तरी प्रत्यक्षात दोन वर्षांत या पुलाच्या कामाचा खर्च २५ कोटी रुपयांनी वाढलेला आहे. त्यामुळे विविध करांसह मंजूर करून देण्यात आलेल्या ५१ कोटी रुपयांच्या या पुलाचा कामाचा खर्च आता प्रत्यक्षात ७७ कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे.

काम न होताच कंत्राट किंमत वाढली!

महापालिकेच्या बी विभागातील माझगावमधील शिवदास चापसी रोडवर असलेल्या हँकॉक पुलाचे बांधकाम धोकादायक ठरल्याने रेल्वेच्या वतीने ते तोडण्यात आले. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु, या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात या कामाच्या प्रगतीचा आलेख वाढलेला नसतानाच याची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढलेला आहे.

- Advertisement -

असा वाढला खर्च!

महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये लोखंडी गर्डर्सचे एकूण वजन ६६० मेट्रिक टन एवढे होते. परंतु, रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस. कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. त्यानुसार लोखंडी गर्डर्सचे वजन वाढवून ते ६६० ऐवजी १३७४ मेट्रिक टन एवढे करण्यात आले. ज्यामुळे २० कोटी ७६ लाखांनी खर्च वाढला. याशिवाय क्राँक्रिट पाईलची खोली १ डी ऐवजी ३ डी करण्यात आल्याने ती दहा मीटरने वाढली. त्यामुळे खर्च १ लाख २२ हजार १७० रुपयांनी वाढला आहे. याशिवाय एम.एस. लाईनर्स तसेच काँक्रीट पाईल कॅपची साईज वाढल्यामुळे अतिरिक्त २२ कोटी १९ लाख रुपये आणि विविध करांसह एकूण २५ कोटी ७१ लाख रुपयांनी हा खर्च वाढला आहे.

पुलाच्या सल्ला सेवासाठी ९९ लाखांचा खर्च

या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्लागार एस. एन. भोबे अँड असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती. तर फेरतपासणीसाठी आय. आय. टी. मुंबईची निवड करण्यात आली होती. यासाठी तांत्रिक सल्लागाराला ६१ लाख ६८ हजार रुपये आणि फेरतपासणीसाठी १० लाख रुपये एवढे सल्लागार शुल्क देण्यात येणार होते. परंतु, या वाढीव कामांमुळे तांत्रिक सल्लागारालाही २८ लाख २४ हजारांचे सल्ला शुल्क वाढवून देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या सल्लागाराच्या नियुक्तीनंतरही प्रकल्पाचा खर्च २५ कोटी रुपयांनी वाढला, त्याच सल्लागाराला वाढीव रकमेवर २८ लाख रुपयांचे सल्लासेवा शुल्क देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -