दिव्यांगांना मिळणार सामान्य मुलांसोबत शिक्षण

Mumbai
मुंबई महापालिकेकडून पुढाकार, मुख्याध्यापक, शिक्षकांना प्रशिक्षण

कर्ण बधिर, मूक बधिरसारख्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांना मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. विशेष गरजा असलेल्या बालकांना सर्वसामान्य मुलांसोबतच शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाने समावेशीत शिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत महापालिका शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विशेष गरजा असलेल्या मुलांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.

कर्ण बधिर, मतिमंद, अंधप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश दिला जात नाही, पण ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी पालिकेकडून समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत अध्यापनतंत्र विकसित करण्यात येत आहे. यामध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येणार्‍या अडचणी, विशेष विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचा पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, नियमित वर्ग अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये विशेष विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, शिक्षकांमध्ये समावेशनाची भावना निर्माण करणे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण कसे देता येईल यावर भर देण्यात येत आहे. महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी भरतकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

विशेष मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांना सक्षम करून सर्व मुले एकत्र शिकू शकतात अशी धारणा कार्यशाळेतून शिक्षकांमध्ये रुजवण्यात येत आहे. अध्यापन तंत्र विकसन कार्यशाळेत आतापर्यंत 234 प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले असून, त्यांना जिल्हा समन्वयक किरण बेठगे, वैभव साखरे, मुख्याध्यापक सुनील भांगरे, अनुजा साबळे, समावेशीत विषय शिक्षण तज्ज्ञ, विशेष शिक्षक तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करणार आले.

शिक्षकांना थेरपीचे प्रशिक्षण
विशेष गरजाधिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी कमी-जास्त संवेदनकारक उत्तेजित वर्तन करणारी असतात. अशावेळी जास्त उत्तेजित असणार्‍या विद्यार्थ्यांचे अतिचंचल वर्तन कमी करण्यासाठी थेरपीची आवश्यकता असते. ही थेरपी सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित देता यावी यासाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सॉयको थेरपीचे प्रशिक्षण वर्गशिक्षकांना देण्यात येणार आहे.

‘करिक्युलर अ‍ॅडाप्टेशन’ विषयावर प्रवर्तक
विशेष गरजाधिष्ठित बालकांना दिव्यांग दृष्टीकोनातून न बघता अध्ययनार्थी दृष्टीकोनातून बघण्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी अध्यापन तंत्र विकसित करण्याबाबत ‘करिक्युलर अ‍ॅडाप्टेशन’ विषयावर प्रवर्तक घडवण्यात येत आहेत. प्रवर्तकांमार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अध्यापन शास्त्राची उंची वाढवणे व नवनवीन हस्तपुस्तिका व कार्यपुस्तिका विकसित करण्यात येत आहेत. जेणेकरून उपक्रमाची अंमलबजावणी सुलभ होईल.