घरमुंबईमालाची ने-आण करण्यावरुन फेरीवाल्याची हत्या

मालाची ने-आण करण्यावरुन फेरीवाल्याची हत्या

Subscribe

चोरबाजार येथील घटना; आरोपीस अटक व कोठडी

मालाची ने-आण करण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून यासीन अल्लार खान मंसुरी या 43 वर्षांच्या फेरीवाल्याची त्याच्याच परिचित मित्राने लोखंडी रॉड डोक्यात बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना घटना शुक्रवारी चोरबाजार परिसरात घडली. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र मोहम्मद जाकीर अब्दुल मस्जिद अन्सारी या 30 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याचे एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

ही घटना शुक्रवारी सव्वाआठ वाजता चोरबाजार येथील चुमना बुचर स्ट्रिट, जमुनादास इमारत, केजीएन अब्दुल-कादर कंपनीसमोर घडली. यासीन आणि मोहम्मद जाकीर हे दोघेही या परिसरात फेरीवाला तसेच मजदूरीचे काम करतात. शुक्रवारी रात्री डिलीव्हरीच्या मालाची ने-आण करण्यावरुन या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्यातून रागाच्या भरात जाकीरने यासीनच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला.

- Advertisement -

त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच जे. जे. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी इसाक अब्दुल हमीर अन्सारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद जाकीरविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील लोखंडी रॉड जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -