घरCORONA UPDATEमुंबईत ४ हजार आरोग्य सेविकांचे आरोग्य धोक्यात!

मुंबईत ४ हजार आरोग्य सेविकांचे आरोग्य धोक्यात!

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या कोरोना वॉरिअर्समध्ये आरोग्य सेविकांचा समावेश आहे. झोपडपट्टीसारख्या आव्हानात्मक परिसरामध्ये आरोग्य सेवा सुविधा देण्यासाठी ४ हजार आरोग्य स्वयंसेविका कार्यरत आहे. या आरोग्य सेविका स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता आपली सेवा देत असल्याने बर्‍याच परिसरात कोरोनाचा फैलाव आटोक्यात येत आहे. मात्र त्यांच्याच आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची धक्कादायत माहिती समोर येत आहे. त्यांना महापालिका रुग्णालयात सामान्य रुग्णासारखी वागणूक दिली जात आहे. इतकेच नव्हे, तर मुंबई महापालिकेकडून आयकार्ड सुध्दा देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना झोपडपट्टी परिसरात काम करत असताना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका आणि पोलीस गेल्या साडेतीन महिन्यांपासून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. डॉक्टर आणि नर्सेसबरोबरच आरोग्य सेविका सुद्धा फ्रंटलाइन वॉरिअर्स आहेत. मात्र या आरोग्य आणीबाणीच्या काळात त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. सध्या ४ हजार आरोग्य सेविकांमध्ये शेकडो सेविकांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यातील अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असताना सुध्दा अशा आरोग्य सेविकांना ऑक्सी मीटरचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे हे काम त्यांच्याकडून तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी आरोग्य सेविकांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना केली आहे.

- Advertisement -

महानगर पालिका कर्मचार्‍यांना शासकीय रुग्णालयात प्राधान्य दिले जाते. मात्र आरोग्य सेविकांकडून सामान्य नागरिकाप्रमाणे १० रुपयांची पावती फाडली जाते. तसेच आरोग्य सेविका असल्याचं सांगितल्यानंतरही ‘तुम्ही महानगर पालिकेचे कर्मचारी नाही’, असं बोलून त्यांना हुसकावून लावण्यात येत असल्याचा आरोप आरोग्य सेविकांनी केला आहे. तसेच अशा कठीण परिस्थितीत जिवाची पर्वा न कराता सेवा देणार्‍या आरोग्य सेविकांना अशा प्रकारची वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रशासनाविरोधात नाराजीचे वातावरण आहे.

ओळखपत्र नसल्याने होतो मनस्ताप

या आरोग्य सेविकांना विशेषत: कंटेन्मेन्ट झोन आणि झोपडपट्टीसारख्या आव्हानात्क परिसरांमध्ये नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा दयावी लागत आहे. मात्र महानगर पालिकेचे ओळखत्र नसल्यामुळे पोलिसांकडून आणि नागरिकांकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात आरोग्य सेविकांची गैरसोय होत आहे. अनेकदा याबाबत तक्रारी करुन सुध्दा प्रशासनाला जाग येत नाहीत.

गेल्या साडे तीन महिन्यांपासून आरोग्य सेविका अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. ज्या आरोग्य सेविकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आहेत, त्यांना ऑक्सी मीटरचे काम देण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ अशा आरोग्य सेविकांच्या आरोग्याची काळजी घेत, त्यांच्याकडून हे काम काढून घेतले पाहिजे.

वेदिका समजीसकर, आरोग्य सेविका

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -