घरमुंबईबदलापूरला परतीच्या पावसाचा तडाखा

बदलापूरला परतीच्या पावसाचा तडाखा

Subscribe

झाडे उन्मळून पडल्याने घरांचे नुकसान

परतीच्या पावसाने बदलापूर व लगतच्या ग्रामीण भागाला जोरदार तडाखा दिला आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे बदलापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरावर झाड पडल्याने चिंचोली येथील राघो गावंडा यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय ग्रामीण भागात काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेल्याचेही सांगण्यात येत आहे.

दसर्‍याच्या दिवशी मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास बदलापूर व परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे तासभर सुरु राहिलेल्या या पावसामुळे बदलापूर शहराच्या पूर्व पश्चिम भागात वेगवेगळ्या ठिकाणी 9 झाडे उन्मळून पडली. बदलापूर पूर्व भागात कल्याण वास्तू हॉलजवळ, एलजी शो रूम जवळ, वाणी आळी , संजय नगर तसेच बदलापूर ट्रान्सपोर्ट जवळील आत्माराम नगर भागात झाडे कोसळली. तर पश्चिम भागात बदलापूर गाव, रमेशवाडी, मानव पार्क, बदलापूर गाव रस्ता आदी ठिकाणी मिळून 9 झाडे कोसळली.

- Advertisement -

मंगळवारी दिवसभर पावसाचे वातावरण नसताना अचानक रात्री साडे आठच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले आणि थोड्या वेळातच मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस सुरूच होता. त्यात वाराही वेगाने वाहत असल्याने रस्त्याच्या बाजूला दुकानांच्या शेडखाली वा इतरत्र आडोशाला उभे राहणारेही भिजून निघत होते. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी बहुतांश लोकांनी स्कायवॉकवर थांबणे पसंत केले होते. तर दुकानात खरेदीसाठी गेलेले अनेक लोक पाऊस थांबेपर्यंत दुकानातच थांबून राहिल्याचे चित्र बदलापूर स्टेशन परिसरात दिसत होते.

वीज पुरवठा खंडीत
बदलापूर लगतच्या ग्रामीण भागातही झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून पावसाच्या या तडाख्यामुळे वीसहून अधिक झाडे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. कोसळलेली झाडे वीजवाहक तारांवर पडल्याने पश्चिम भागात वीजपुरवठाही खंडित झाला. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत रस्त्यात कोसळलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरु ठेवले होते. महावितरणचे अधिकारी कर्मचार्‍यांनीही खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. दरम्यान परतीच्या पावसाच्या या तडाख्यामुळे शेतकरी वर्गात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -