घरमुंबईमुंबई-ठाण्याचे तीनतेरा जबाबदार कोण?

मुंबई-ठाण्याचे तीनतेरा जबाबदार कोण?

Subscribe

पावसाचा कहर

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह राज्यात कोसळणारा पाऊस सोमवारी जीवघेणा झाला. प्रशासनाचा कामचुकारपणा, आपत्ती व्यवस्थापनातील हलगर्जी आणि सुस्त राजकर्त्यांमुळे या पावसाने राज्यभरात तब्बल ४१ बळी घेतले आहेत. मुंबईच्या मालाड येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून त्या ढिगार्‍याखाली २2 जणांनी प्राण सोडले. त्यात सात बालकांचा समावेश आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे सिंहगड कॉलेजची संरक्षक भिंत पडल्याने त्याखाली सहा मजूर गाडले गेले. कल्याणमध्ये एका शाळेची संरक्षक भिंत कोसळली आणि त्यात दोन महिला आणि एका लहान मुलीसह तीन जणांचे बळी गेले. नाशिकमध्ये एका बिल्डरने बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला. मुंबईतील मालाड सबवेमध्ये तुंबलेल्या पाण्यात स्कॉर्पियो गाडी अडकली.

या गाडीत दोघे गुदमरून ठार झाले. मुंबईच्या विलेपार्ले विभागात विजेचा धक्का लागून एक तरुण ठार झाला तर मुलुंडमध्ये भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. तर जव्हारमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे बळी पावसाचे की ज्यांच्या जीवावर मुंबई, राज्यातील जनता स्वत:ला सुरक्षित समजते, त्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे? याची जबाबदारी निश्चित होणार आहे का, असा सवाल आज राज्याची जनता उपस्थित करत आहे. राज्यकर्ते आणि प्रशासन पावसाला जबाबदार ठरवून आपली जबाबदारी मात्र झटकत आहेत.

- Advertisement -

दरम्यान,सोमवारी रात्री कोसळलेल्या तुफान पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी तुंबल्याने मंगळवारी मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाल्या होत्या. तर पश्चिम रेल्वे उशिराने धावत होती. सुरक्षेचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज बंद होते. मुंबईकरांनीही घरीच रहाणे पसंद केले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या मुंबईचे रस्ते तुंबलेल्या पाण्यात शांत पहुडले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वे सुरू झाली तर पश्चिम रेल्वे वेळेवर धावू लागली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबई, ठाणे, पालघर वरील धोका टळलेला नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पाऊस हा नैसर्गिक आपत्ती आहे. महापालिकेची यंत्रणा नाहीतर जगातील कोणतीही यंत्रणा अशा पावसासमोर हतबल होईल हे सत्य आहे. गेल्या तीन-चार दिवसात मुंबईत प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. ही आपत्कालीन परिस्थिती आहे यासाठी पालिकेला दोष देऊन चालणार नाही .-आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख, शिवसेना.

- Advertisement -

मुंबईत मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण असून, झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत. तीन आणि चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत. या झोपड्यांवर कडक कारवाई करून नाले रुंदीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

दरवर्षी नालेसफाईचे दावे होतात. मात्र हे दावे फोल ठरतात. त्यामुळे पालिकेच्या आतापर्यंतच्या कामाची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणी महापौर जरी चुकत असतील, तरी तातडीने कारवाई करा. वेळ पडली तर महापालिकेवर प्रशासक नेमा.
-अजित पवार, नेता, राष्ट्रवादी काँग्रेस.

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. जनजीवन ठप्प झाले तरी मुंबई कुठे तुंबली असा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात. देवदर्शनाऐवजी नालेसफाई केली असती तर मुंबई बुडाली नसती!
-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -